माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या आत्मचरित्रात जे कथित उल्लेख आहेत त्यावरुन वाद सुरु आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला आणि संसदेत गेल्या आठवड्यात गदारोळ झाला. दरम्यान फोर स्टार ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राबाबत आता माजी लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी मौन सोडलं आहे. हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही त्यातले उल्लेख राहुल गांधी कसे काय वाचून दाखवू शकतात असा सवाल सत्ताधारी मंत्र्यांनी आणि खासदारांनी लोकसभेत केला होता. त्यावरुन बराच वादंग झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज सोमवार (९ फेब्रुवारीपर्यंत) तहकूब करण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणावर आता एम. एम. नरवणेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय आहे एम. एम. नरवणे यांची पोस्ट?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर नरवणे यांनी पेंग्विनची नोट पोस्ट केली आहे. त्यात नरवणे म्हणाले की सध्या आत्मचरित्राची स्थिती अशी आहे. एका ओळीत त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांचं आत्मचरित्र अद्याप प्रकाशित झालेलं नाही. तसंच या पुस्तकाची कुठलीही अधिकृत प्रत सार्वजनिक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आलेली नाही.

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने काय म्हटलं?

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने सगळ्या गदारोळानंतर एक पोस्ट लिहित हे म्हटलं आहे की एम. एम. नरवणे यांचं आत्मचरित्र फोर स्टार ऑफ डेस्टिनी च्या प्रकाशनाचे सगळे हक्क आमच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. हे पुस्तक मुद्रित किंवा डिजिटल रुपात उपलब्ध नाही. या पुस्तकाची कुठलीही प्रत मग ती मुद्रित असो किंवा डिजिटल कुठल्याही स्वरुपात ती प्रत उपलब्ध नाही. असं पेंग्विन तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. कुणीही या पुस्तकातील पानं एखाद्या खुल्या मंचावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मांडत असेल त्यातल्या लेखनाचा उल्लेख करत असेल तर तो कॉपीराईटचा भंग मानला जाईल.

२४ तासांत पेंग्विनतर्फे दुसरं स्पष्टीकरण

पेंग्विनने हे स्पष्टीकरण दिलेलं असतानाच अवघ्या २४ तासांच्या आत आणखी एक पोस्ट करण्यात आली. या पोस्ट मध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की जो पर्यंत हे पुस्तक प्रकाशित होत नाही आणि वाचकांच्या हाती येत नाही तोपर्यंत हे प्रकाशित झालं आहे असं म्हणता येणार नाही. प्री ऑर्डर, लिस्टिंग आणि प्रकाशन असे तीन टप्पे असतात. प्री ऑर्डर लिंक आली याचा अर्थ पुस्तक प्रकाशित झालं आहे असा होत नाही. असं पेंग्विनने म्हटलं आहे.

नरवणे यांनी वादावर मौन सोडलं ही बाब महत्त्वाची

दरम्यान या सगळ्या गोष्टी सुरु असतानाच माजी लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी मौन सोडणं महत्त्वाचं मानलं जातं आहे. राहुल गांधी यांनी २०२३ मध्ये नरवणे यांनी केलेल्या एक पोस्टचा उल्लेखही केला होता. माझं पुस्तक उपलब्ध आहे लिंक फॉलो करा असं त्यांनी सांगितल्याचं राहुल गांधी म्हणाले होते. दरम्यान पुस्तक अद्याप प्रकाशित नाही हे आता नरवणे यांनीही स्पष्ट केलं आहे.