Former CIA Director Leon Panetta states Donald Trump is solely responsible for the current Iran War deadlock : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष जेवढा लांबणीवर पडत आहे, तेवढा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढताना दिलत आहेत. या युद्धामुळे सध्या ट्रम्प यांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागत असून यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग आढळून येत नाहीये. यादरम्यान अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव आणि सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA)चे माजी संचालक लिऑन पॅनेटा (Leon Panetta) यांनी डोनाल्ड ट्रम्प एका कठीण अशा पेचात अडकले असल्याचे म्हटले आहे.

‘द गार्डियन’शी बोलताना ते म्हणाले की, मध्यपूर्वेतील हे संकट प्रामुख्याने त्यांनी स्वत: तयार केलेले आहे. लिऑन पॅनेटा यांच्या मते ही जोखीम अनपेक्षित नव्हती. त्यांनी असेही नमूद केले की, इराण होर्मुझची सामुद्रधुनी रोखून जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा आणू शकतो, याची कल्पना अमेरिकन सुरक्षा अधिकार्‍यांना गेल्या अनेक वर्षांपासून होती. हा एक सर्वांना माहिती असलेला धोका होता, पण भूतकाळात याबाबत वारंवार इशारे देऊनही सध्या सुरू असलेल्या संघर्षात याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले, असेही ते म्हणाले.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, पॅनेटा म्हणाले की, “जर तुम्ही इराणविरोधात युद्ध करणार असाल तर, तर होर्मुझची सामुद्रधुनी ही सर्वात मोठ्या कमकुवत बाजूंपैकी एक आहे, हे समजून घेणे हे काही रॉकेट सायन्स नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या परिस्थितीवरून तयारीचा स्पष्ट अभाव दिसून येतो. तसेच त्यांनी दावा केला की एकतर प्रशासनाने इराणच्या प्रत्युत्तराला कमी लेखले किंवा संघर्ष लवकर संपेल असे गृहित धरण्यात आले. “ते यासाठी तयार नव्हते आणि आता त्याची किंमत मोजत आहेत,” असे पॅनेटा म्हणाले. तसेच त्यांनी इशाराही दिला की, याचे परिणाम फक्त त्या प्रदेशापुरते मर्यादित नसून संपर्ण जागतिक बाजारपेठांवर दिसून येत आहेत.

माजी सीआयए (CIA) प्रमुखांनी सुरुवातीच्या लष्करी कारवाईच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या कारवाईत अमेरिकेला अपेक्षित होते, त्याप्रमाणे इराण कमकुवत झाला नाही असे ते म्हणाले. तसेच याउलट इराणमधील नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचे आणि आता मोजतबा खामेनी यांच्यासारखा अधिक कट्टरपंथी चेहरा सत्तेत आल्याचा युक्तीवाद त्यांनी केला.

इराणविरोधातील युद्ध आता चौथ्या आठवड्यात गेले असून यामुळे अमेरिकेत ट्रम्प यांच्यावरदेखील दबाव वाढताना दिसत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि युद्ध कधी संपणार याबद्दल असलेली अनिश्चितता यामुळे अनेक अमेरिकन लोक ट्रम्प यांना या मुद्द्यावर दिलेल्या त्यांच्या पाठिंब्याबद्दल फेरविचार करत आहेत. रॉयटर्स/Ipsos ने केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ५९ टक्के अमेरिकन नागरिक इराणवरील अमेरिकन हल्ल्यांच्या विरोधात आहेत.

“ते (ट्रम्प) एका अत्यंत कठीण अडचणीचा सामना करत आहेत,” असे पॅनेटा म्हणाले. कोणताही पर्याय निवडला तरी तो गंभीर परिणामांशिवाय असणार नाही. यातून माघार घेणे हे अपयश मानले जाऊ शकते, तर दुसरीकडे युद्ध वाढवल्यास परिस्थिती अधिक बिघडण्याचा धोका आहे.

या युद्धासाठी जबाबद कोण आहे, याबद्दल त्यांनी अगदी परखडपणे आपले मत मांडले. पॅनेटा म्हटले की, “डोनाल्ड ट्रम्प आज ज्या परिस्थितीत आहेत, त्याला त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही जबाबदार नाही.” तसेच माजी सीआयए प्रमुखांनी यावेळी ट्रम्प प्रशासनाच्या मित्रराष्ट्रांबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. “जर तुम्ही युद्धाची योजना आखत असाल, तर तुमच्या मित्रराष्ट्रांशी चर्चा करणे ही काही वाईट बाब नाही” असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी तणावपूर्ण संबंधांमुळे अमेरिकेला या संकटातून मार्ग काढणे अधिक कठीण होऊ शकते, असा इशाराही दिला.