अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करताना इटलीच्या सरकारी मालकीच्या विमाननिर्मिती कंपनीने भारताचे तत्कालिन हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यांगी यांना मध्यस्थामार्फत लाच दिल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. फिनमेकानिका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोजफ ओर्सी यांना मंगळवारी लाच दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. याप्रकरणी इटलीतील तपास पथकातील अधिकाऱयांनी दिलेल्या अहवालात त्यागी यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दल वृत्त दिले आहे.
हेलिकॉप्टरच्या मागणीचे कंत्राट इटलीच्या कंपनीलाच मिळावे, म्हणून एकूण तीन हजार ५४६ कोटी रुपयांच्या कंत्राटात ओर्सी यांनी ३६२ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. इटलीतील बस्टो अर्सिझिओ शहरातील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एकूण ६४ पानी अहवालामध्ये या प्रकरणाच्या तपासाबद्दल माहिती देण्यात आली आहे. हे कंत्राट पूर्णत्वास जावे, म्हणून त्यागी यांना मध्यस्थांमार्फत लाच देण्यात आली होती. त्यांना दिलेल्या लाचेची रक्कम नेमकी किती होती, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे अहवालात म्हटले आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याप्रकरणी दिलेल्या वृत्तात ज्युली त्यागी आणि एस. पी. त्यागी यांचे जवळचे संबंध असल्याचे म्हटले होते. त्यावेळी इटलीतील तपासपथकाने ज्युली त्यागी यांचे नाव कंत्राट मिळवण्याच्या प्रकरणात गुंतले असल्याचे स्पष्ट केले होते. एस. पी. त्यागी यांनी आपण ज्युली यांना ओळखतो. मात्र, आमच्या दोघांमध्ये कोणत्याही स्वरुपाचे व्यावसायिक संबंध नसल्याचे त्यावेळी म्हटले होते.
सैन्यातील एका दलाच्या प्रमुखाचेच नाव भ्रष्टाचाराच्या आऱोपात गुंतल्याचे देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीला कंत्राट देण्यासाठी अटी आणि नियमांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आले. जेणेकरून या कंपनीला लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. याच कामासाठी इटली आणि भारतामध्ये मध्यस्थांमार्फत ३६२ कोटींची लाच देण्यात आली, असे अहवालात म्हटले आहे.