Bhaskar Rao MHA Letter Bengaluru Protest: भाजपा नेता आणि निवृत्त आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून यूट्यूबर ध्रुव राठीचे नागरिकत्व आणि व्हिसा स्टेटसची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बंगळुरूमध्ये गुरूवारी (८ ऑक्टोबर) सीजेपीतर्फे निवडणूक आयोगाची एसआयआर प्रक्रिया आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात ध्रुव राठीही सामील झाला होता. यानंतर भास्कर राव यांनी हे पत्र लिहिले आहे. ध्रुव राठी जर्मन नागरिक असल्यामुळे विदेशी नागरिक भारतात राजकीय आंदोलनात सहभागी होऊ शकतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कॉक्रोच जनता पार्टीने बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे निवडणूक आयोगाच्या विरोधात जाहीर सभा घेतली. या सभेत ध्रुव राठीने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. या आंदोलनात अभिनेते प्रकाश राजही सहभागी झाले होते. यानंतर भाजपा नेते भास्कर राव यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहून याबाबतची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भास्कर राव यांनी पत्रात मागणी केली की, यूट्यूबर ध्रुव राठीने यापूर्वी कधी भारतातील आंदोलनात सहभाग घेतला होता का? तसेच त्याच्या कृतीमुळे परदेशी नागरिक कायदा, १९४६ चे उल्लंघन होत आहे का? याचा तपास केला जावा. तसेच गरज भासल्यास योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी सुचवले आहे. तसेच हे पत्र ध्रुव राठीच्या राजकीय मतांशी मतभेदातून प्रेरित झालेले नाही, असेही भास्कर राव यांनी स्पष्ट केले.
ताजी अपडेट
ध्रुव राठीला १० ऑक्टोबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सोडल्यानंतर ध्रुव राठीने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपला भारतीय पासपोर्ट दाखवला.
भास्कर राव यांचे आरोप काय?
राव यांनी पत्रात केलेल्या दाव्यानुसार, बंगळुरूमधील आंदोलनात ध्रुव राठीने निवडणूक आयोगावर जाहीर टीका केली. एसआयआर प्रक्रियेत पारदर्शकतेचा आणि जबाबदारीचा अभाव असल्याचे ते म्हणाले. एखाद्या विदेशी नागरिकाला भारतात येऊन राजकीय आंदोलन करण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न भास्कर राव यांनी उपस्थित केला.
ध्रुव राठी जर्मन नागरिक असल्याचा दावा भास्कर राव यांनी आपल्या पत्रात केला. जर ते जर्मन नागरिक असतील आणि त्यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेविरोधात आंदोलन केले असेल तर यातून गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी.
ध्रुव राठीने काय म्हटले होते?
आंदोलनात सहभागी झालेल्या ध्रुव राठी यांनी म्हटले होते, “मी पहिल्यांदाच आंदोलनात सहभागी झालो आहे. मी काल बंगळुरूत आलो, तेव्हा सोशल मीडियावर ध्रुव राठी सरकार उलथवून लावायला येत आहे, अशा पोस्ट व्हायरल झाल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत असेल की, माझा त्यांच्याशी काही वैयक्तिक वाद आहे; मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, संपूर्ण देशालाच आता त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.”
