जयपूरमध्ये सायबर गुन्हेगारांनी ९० वर्षीय माजी जिल्हा न्यायाधीशांना सुमारे १५ दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआय अधिकारी आणि आरबीआय मॅनेजर असल्याचे भासवून आरोपींनी त्यांच्याकडून तब्बल २.५ कोटी रुपये उकळले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबद्दलचे सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरून धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी माजी जिल्हा न्यायाधीश भंडारी यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता आणि आपण मुंबईतील सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. भंडारी यांच्या नावावर असलेल्या एसबीआय बँक खात्यात ४० लाख रुपये जमा झाल्याचे आणि त्याचा संबंध ५० कोटी रुपयांच्या हवाला व्यवहाराशी असल्याचा दावा आरोपीने केला. त्यानंतर अटक करण्याची धमकी देत भंडारी यांना कोणालाही याबाबत माहिती न देण्यास सांगितले.

आरबीआयचे मॅनेजर बनून आर्थिक माहिती घेतली

यानंतर आणखी एका व्यक्तीने व्हॉट्सॲप वरून संपर्क साधला. त्याने स्वतःची ओळख आरबीआयचा मॅनेजर म्हणून करून दिली. हवाला व्यवहारातील पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवण्यात आल्याचे सांगून त्याने भंडारी यांच्याकडून म्युच्युअल फंड, बँक खाती आणि इतर आर्थिक गुंतवणुकीची माहिती मागितली. भंडारी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून आवश्यक आर्थिक कागदपत्रे आणि माहिती त्यांच्याबरोबर शेअर केली.

तपासासाठी पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले

यानंतर आरोपींनी तपासात मदत करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले. तक्रारीनुसार ३ ते १० ऑगस्टदरम्यान भंडारी यांनी गांधी नगर येथील SBI खात्यातून तब्बल २.५ कोटी रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. आरोपी प्रत्येक संभाषणानंतर व्हॉट्सॲप चॅट, कॉल लॉग आणि इतर मेसेज डिलीट करण्यास सांगत होते. त्यामुळे कुटुंबीयांना या फसवणुकीची माहिती मिळू नये, असा त्यांचा प्रयत्न होता.

पीपीएफ मधूनही पैसे काढण्याचा प्रयत्न

सायबर चोरट्यांनी भंडारी यांना त्यांच्या पीपीएफ खात्यातूनही पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. बुधवारी ते जयपूरच्या जोहरी बाजार येथील एसबीआय शाखेत पैसे काढण्यासाठी गेले. मात्र व्यवहारादरम्यान बँक व्यवस्थापकाला संशय आला. व्यवस्थापकाने भंडारी यांच्याशी संवाद साधला असता ते सायबर फसवणुकीचे बळी ठरल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भंडारी यांच्या पुतण्याला याबाबत माहिती दिली.

पुतण्याने पोलिसांत तक्रार दाखल केली

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुतण्याने जयपूरच्या ज्योती नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.