मणिपूरचे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांवरच अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भाजपाच्या प्रदेश युनिटमधील काही नेत्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा कट रचला, असा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये आल्यानंतर आपण दोनदा मुख्यमंत्री झालो, हे पक्षातील काही नेत्यांना पचनी पडले नाही, असा थेट आरोपही त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वी मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात आले होते.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करण्याची राज्यातील जनतेची तीव्र मागणी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

‘पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ६५ वर्षीय बिरेन सिंह यांनी सांगितले की, २०१७ पासूनच पक्षातील काही स्थानिक नेत्यांकडून आपल्याला चांगली वागणूक दिली जात नव्हती. मात्र, फेब्रुवारी २०२५ मधील आपल्या राजीनाम्यामागे भाजपचे केंद्रीय नेतृत्व जबाबदार नसून, केवळ राज्यातील काही गटबाजी करणारे नेते जबाबदार असल्याचा खुलासा त्यांनी केला. “२०१७ पासून मला चांगली वागणूक मिळाली नाही. मी दिल्लीतील नेतृत्वावर आरोप करत नाही, पण राज्यातील काही नेत्यांनी काँग्रेसबरोबर मिळून माझ्याविरुद्ध कट रचला,” असेही बिरेन सिंह म्हणाले.

“काँग्रेसमधून भाजपामध्ये येऊनही मी सलग दोनदा मुख्यमंत्री कसा झालो, हे अनेक आमदारांना कधीच मान्य करता आले नाही. हे नेते भाजपाला स्वतःची खासगी मालमत्ता समजतात. त्यामुळेच त्यांनी योजना आखून, कट रचून मला राजीनामा देण्यास भाग पाडले”, असाही आरोप त्यांनी केला.

मणिपूरमध्ये सध्या भाजपाचे वाय. खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत असून, २०२५ मध्ये बिरेन सिंह यांना पदावरून हटवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खेमचंद सिंह आघाडीवर होते.

‘माझ्या राजीनाम्यानंतर शांतता प्रस्थापित झाली का?’

आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास राज्यात शांतता प्रस्थापित होईल, या दाव्यावर बिरेन सिंह यांनी जोरदार आक्षेप घेतला. राज्यात नागा आणि कुकी समुदायांमध्ये अजूनही सुरू असलेल्या संघर्षाकडे त्यांनी लक्ष वेधले. बहुसंख्य समाजाची बाजू घेतल्याचा आणि ध्रुवीकरणाला खतपाणी घातल्याचा आपल्यावर आरोप करणाऱ्यांना आव्हान देत त्यांनी विचारले की, आपल्या राजीनाम्यानंतरही हिंसाचार का थांबलेला नाही?

“आता बिरेन सत्तेबाहेर आहे. मग आता काय घडत आहे? किती नागा बांधवांचा मृत्यू झाला? माझ्यावर आरोप केले जात होते की मी बहुसंख्यकांची बाजू घेतो. पण आता ख्रिश्चन विरुद्ध ख्रिश्चन असा संघर्ष सुरू आहे. मग आता युरोपीय युनियन कुठे गेली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.