Salim Wastik Ex Muslim YouTuber arrest news update by Delhi Police crime branch : सलीम खान नावाच्या एका व्यक्ताने जवळपास ३० वर्षांपूर्वी एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण आणि हत्या केली. त्यानंतर जामिनावर बाहेर असताना तो पोलिसांना गुंगारा देऊन गायब झाला. या घटनेला २५ वर्षांपेक्षा जास्त काळा उलटून गेला आहे.

गेल्या काही वर्षात तो युट्यूबवर दिसू लागला, पण त्याला कोणीही ओळखले नाही. युट्यूबवर त्याने इस्लामबद्दल काही वादग्रस्त मते मांडली, ज्यामुळे त्याला एक ठराविक प्रेक्षकवर्ग देखील मिळाला आणि ‘एक्स-मुस्लिम’ म्हणून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या युट्यूबरवर त्याने धर्मासंबंधी केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे दोन भावांनी हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलफाम आणि झिशान अशी या दोन हल्लेखोर भावांची नावे आहेत. काही दिवसांतच, उत्तर प्रदेश पोलिसांनी गाझियाबादमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींत दोन्ही भावांना ठार केले.

मात्र शनिवारी (२५ एप्रिल) रोजी या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले, जेव्हा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या युट्यूबरला शोधून काढत त्याला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यासाठी सलीम वस्तिक (Salim Wastik) या नावाने युट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या सलीम खान उर्फ सलीम अहमदला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. १९९५ मध्ये केलेल्या त्या गुन्ह्यानंतर तब्बल ३१ वर्षांनी त्याला अटक करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय होतं?

पोलिसांनी सांगितले की सलीम हा गेल्या काही दशकांपासून फरार होता आणि त्याने स्वतःची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता अशी तयार केली होती. मात्र सलीम याला गाझीयाबादच्या लोनी येथून अटक करण्यात आले आहे.

नॉर्थ ईस्ट दिल्लीतील एका सिमेंट व्यापाऱ्याचा १३ वर्षांचा मुलगा संदीप बन्सल याच्या १९९७ मधील अपहरण आणि हत्या प्रकरणात सलीमला दोषी ठरवण्यात आले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) संजीव यादव यांनी दिली.

हा गुन्हा जानेवारी १९९५ मध्ये घडला होता, ज्यामध्ये एक मूल शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडले आणि पुन्हा कधीच घरी परतले नाही. त्यानंतर मुलाच्या वडिलांना त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचा एक फोन आला आणि त्याला सुखरूप सोडण्यासाठी ३० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली, असे यादव यांनी सांगितले.

फोन करणाऱ्या व्यक्तीने मुलाच्या वडिलांना लोनी उड्डाणपुलाजवळ पैसे पोहोचवण्यास सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, पैशांची देवाणघेवाण होण्यापूर्वीच पीडित मुलाच्या शाळेतील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकावर संशयाची सुई वळली. त्या व्यक्तीचे नाव सलीम खान असे होते, जो नंतर सलीम वास्तिक बनला

साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी सलीमला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीदरम्यान सलीमने कथितपणे गु्न्हा कबुल केला आणि पोलिसांना मुस्तफाबाद येथील एका गटारापर्यंत घेऊन गेला. तेथे पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडला, असे यादव यांनी सांगितले.

अधिकच्या तपासात सलीम याचा एक सहकारी अनिल याचा सहभाग देखील समोर आला. या अनिल नावाच्या व्यक्तीनेच कथितपणे खंडणीसाठी फोन केला होता, तसेच अपहरणाची योजना आखण्यात मदत केली होती.

सलीम आणि अनिल या दोघांनाही अटक करण्यात आले होते. हत्येनंतर दोन वर्षांनी, म्हणजेच १९९७ मध्ये, दिल्लीतील एका न्यायालयाने या दोघांनाही दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, अशी माहिती यादव यांनी दिली.

तीन वर्षांनंतर, २००० मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने अपील प्रलंबित असताना सलीमला अंतरिम जामीन मंजूर केला. तो तुरुंगाच्या बाहेर आला, पण पुन्हा कधीही परतला नाही. २०११ मध्ये सलिम फरार असताना उच्च न्यायालयाने देखील त्याची शिक्षा कायम ठेवली होती.

गायब झालेला हा व्यक्ती अचानक इंटरनेटवर चर्चेत आला, त्यानंतर त्याच्यावर एका जीवघेणा हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार असतानाच्या काळात सलीमने पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी खूप प्रयत्न केले. त्याने सरकारी कागदपत्रांमध्ये स्वतःला मृत घोषित करण्यात तो यशस्वी झाला होता. त्यानंतर त्याने एक नवीन ओळख धारण केली अशा प्रकारे सलीम वास्तिक किंवा सलीम अहमद या नावाने राहू लागला.

या वर्षांमध्ये सलीम हा हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये राहिला. या काळात त्याने अनेक कामे केली. त्याने फर्निचर बनवण्याचे काम तसेच इतरही अनेक छोटी-मोठी कामे केली असे पोलिसांनी सांगितले. अखेर तो गाझीयाबादच्या लोनी येथे स्थायिक झाला.

लोनी येथे सलीमने नवं आयुष्य उभं केलं. येथे तो महिलांचे कपडे आणि फॅशन ॲक्सेसरीज विक्रीचे दुकान चालवत होता. त्याने एक ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्याने एक युट्यूब चॅनेलही सुरू केले. या माध्यमातून सलीम वास्तिक या बनावट ओळखीखाली त्याने स्वतःची एक सार्वजनिक प्रतिमा तयार केली होती.

या वर्षाच्या २७ फेब्रुवारीच्या सकाळी, गुलफाम आणि जीशान या दोन भावांनी कथितपणे सलीमच्या घरात घुसून त्याच्यावर रेझरने हल्ला केला. त्यांनी त्याच्या पोटात आणि गळ्यावर वार केले.

या हल्ल्याच्या समोर आलेल्या कथित व्हिडीओमध्ये कुर्ता पायजमा घातलेले दोन व्यक्ती त्याच्या ऑफिसात सोफ्यावर बसलेल्या सलीमवर हल्ला करताना दिसत आहेत. या दोघांचा चेहरा हेल्मेटने झाकला होता.

सलीम वास्तिक या हल्ल्यातून बचावला, मात्र त्याला झालेल्या जखमांमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख २२ वर्षांचा जीशान आणि त्याचा मोठा भाऊ गुलफाम (३५) अशी पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही भाऊ कट्टरपंथी होते आणि सलीम वास्तिकने युट्यूबवर इस्लामबद्दल मांडलेल्या विचारांमुळे संतापून हा हल्ला केला होता.

लोनीमध्ये १ मार्च रोजीझालेल्या एका पोलीस चकमकीत जीशान ठार झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी ३ मार्च रोजी गाझियाबादमधील इंदिरापुरम परिसरात गुलफामलाही ठार करण्यात आले. या दोन्ही चकमकी रात्रीच्या वेळी घडल्या आणि पोलिसांनी सांगितले की, दोन्ही भावांनी गोळीबार केल्यानंतर स्वरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागला. रुग्णालयात नेले असता दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. या दोन्ही भावांवर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

सलीम कसा सापडला?

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर सलीम वास्तिक याचे सत्य उघड झाले. शनिवारी या प्रकरणाला एक नवीन आणि नाट्यमय वळण मिळाले.

गुन्हे शाखेच्या अँटी-रॉबरी अँड स्नॅचिंग सेल (ARSC) च्या एका विशेष पथकाला फरार गुन्हेगार सलीम खान याच्याशी जुळणाऱ्या एका व्यक्तीबद्दल गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पाळत ठेवली आणि जुने फोटो तसेच बोटांचे ठसे वापरून पडताळणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात उघड झाले की युट्यूबर सलीम वास्तिक हा तोच व्यक्ती आहे ज्याला १९९५ च्या हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि जो जामिनावर सुटल्यानंतर गायब झाला होता. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले.

लोनी पोलिसांच्या मदतीने काही आठवडे पाळत ठेवण्यात आल्यानंतर आरोपीला पकडण्यात आले. विशेष म्हणजे, मार्चमध्ये रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी वास्तिकला चक्क सुरक्षा पुरवली होती.

चौकशीदरम्यान सलीमने सांगितले की, जामीन मिळाल्यावर पळून गेल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून सतत राहण्याच्या जागा आणि ओळख बदलत राहिला. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर आरोपीला त्याची जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.