देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे अखेर त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यात मनमोहन सिंग यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एम्समध्येच दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. मनमोहन सिंग करोनावर मात करून घरी देखील परतले होते.

८९ वर्षीय मनमोहन सिंग यांना सोमवारी ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांना बरं वाटू लागलं होतं. मात्र, नंतर त्यांना अशक्त वाटू लागल्याने अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.