शाळेच्या माजी प्राचार्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या प्राचार्याने सदर मुलीवर वारंवार बलात्कार केला होता ही बाब समोर आली आहे. ही घटना गुजरातच्या कच्छमधली आहे. कच्छ पोलिसांनी या माजी प्राचार्याला अटक केली आहे. या प्रकरणात शाळेचे विश्वस्त, प्रशासक आणि वसतिगृहाचे अधीक्षक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी या पीडितेच्या आई वडिलांनी कच्छ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ज्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली आहे. हे प्रकरण एक महिन्याने उजेडात आलं आहे.
पोलीस निरीक्षकाने नेमकं या घटनेबाबत काय सांगितलं?
या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकाने इंडियन एक्स्प्रेसला याबाबत सांगितलं की हे प्रकरण ज्या शाळेत घडलं त्या शाळेने या प्राचार्याला ऑगस्ट महिन्यातच कामावरून कमी केलं. त्याला आता गुजरातमधल्या आणंदमधून अटक करण्यात आली आहे. ही घटना उजेडात कशी आली हे विचारलं असता या पोलीस निरीक्षकाने सांगितलं की शाळेत एक प्रेग्ननंसी किट आढळून आलं हे किट वऱ्हाड्यांत पडलं होतं. त्यानंतर हॉस्टेल आणि शाळेचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. ज्यावेळी हे लक्षात आलं की हे किट शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खिशातून खाली पडलं आहे. ज्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली. ज्यात या प्राचार्याने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची बाब उघड झाली. त्यानंतर या शाळेच्या विश्वस्तांनी या प्राचार्याला शाळेतून काढून टाकलं. त्यानंतर त्यांनी या मुलीच्या घरातल्यांना बोलवलं आणि तिला घरी पाठवून दिलं. सदर मुलगी ही गरोदर नव्हती. पण शाळेच्या आवारात या सगळ्या गोष्टी घडल्या. या मुलीच्या आई वडिलांनी तक्रार नोंदवली ज्यानंतर या प्रकरणात माजी प्राचार्याला अटक करण्यात आली.
एकाहून अधिकवेळा मुलीवर बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या माजी प्राचार्याने या मुलीवर एकाहून अधिक वेळा बलात्कार केला होता. ही घटना वसतिगृहाच्या मागच्या भागात असलेल्या एकांतात घडली होती. या शाळेत असं काहीतरी घडलं आहे याबाबतची एक बातमी Shady Activities या नावाने छापून आली. ज्यानंतर या प्रकरणात चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. पण शाळेने २४ सप्टेंबर रोजी पोलिसांना एक अहवाल देऊन फक्त इतकंच कळवलं की शाळेत एक प्रेग्ननंसी टेस्ट किट सापडलं आहे. या चौकशी अहवालात शाळेतल्या मुलीचा, बलात्काराचा कसलाही काहीही उल्लेख नव्हता. त्यामुळेच शाळेचे विश्वस्त, वसतिगृहाचे अधीक्षक यांच्यावरही माजी प्राचार्याला पाठिशी घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ सप्टेंबरला काय घडलं?
२५ सप्टेंबरला पीडित मुलीचे आई वडील कच्छ येथील पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे त्यांनी बलात्काराची तक्रार नोंदवली. ज्यानंतर पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत माजी प्राचार्याला अटक करण्यात आली. तसंच हॉस्टेल वॉर्डन असलेली महिला आणि तीन पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
