SC judge alleges ex Rajasthan Chief Justice : राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी प्रभारी मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा यांच्याविरोधात आता चौथे पत्र समोर आलं आहे. ३० ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पाठवलेल्या चौथ्या पत्रात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप मेहता यांनी न्यायमूर्ती शर्मा यांच्या मनमानी, संशयास्पद आणि उघडपणे दडपशाहीच्या कृत्यांबाबत आणखी माहिती आणि पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
न्यायमूर्ती शर्मा यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप न्यायमूर्ती मेहता यांनी केला आहे. त्याकरता त्यांनी २ ऑगस्ट, १० ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना पत्र पाठवलं होतं. या पत्राची प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममधील इतर सदस्यांनाही पाठवण्यात आली होती. तसंच, त्यांच्याकडे आलेल्या अनेक तक्रारींमुळे न्यायमूर्ती शर्मा यांच्या प्रामाणिकतेबाबत शंका निर्माण झाल्या आहेत, असा दावा मेहता यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती मेहता यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीशांची अन्य उच्च न्यायालयात बदली करून राजस्थान उच्च न्यायालयासाठी नवीन मुख्य न्यायाधीश नियुक्त करण्याची मागणीही केली होती.
चौथ्या पत्रात नेमकं काय?
आता समोर आलेल्या चौथ्या पत्रात न्यायमूर्ती मेहता यांनी न्यायमूर्ती शर्मा यांच्यावर अंतर्गत न्यायिक चौकशीत हस्तक्षेप केल्याचा, गोपनीयतेचा भंग केल्याचा आणि प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय नियमांमध्ये मनमानी पद्धतीने बदल करणे, जमिनीच्या वादात न्यायालयीन हस्तक्षेप करणे तसेच राजस्थान उच्च न्यायालयातील व्यापक भ्रष्टाचार आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या ढासळण्याचेही आरोप त्यांनी केले आहेत.
माझ्यावरील आरोप निराधार- शर्मा
यापूर्वी २ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती शर्मा यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटलं होतं.“माध्यमे आणि सोशल मीडियामध्ये अलीकडे घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट करू इच्छितो की, माझ्यावरील सर्व आरोप मी फेटाळून लावतो. हे सर्व आरोप निराधार असून संबंधित न्यायमूर्तींनी वैमनस्यातून हे आरोप केले आहेत”, असं न्यायमूर्ती शर्मा यांनी हिंदीतील निवेदनात म्हटलं होतं.
“मी माझी बाजू सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्यासमोर मांडली आहे. संदीप मेहता यांनी त्यांच्या पत्रांमधून केलेले निराधार, खोटे आणि तथ्यहीन आरोप मी पुराव्यांसह फेटाळून लावले आहेत. CJI निर्णय देईपर्यंत माध्यमांनी, वकिलांनी आणि इतरांनी न्यायाच्या तत्त्वांचा आदर करून संयम बाळगावा, अशी माझी नम्र विनंती आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. योग्य वेळ आल्यानंतर आणि CJI यांची परवानगी मिळाल्यावर मी स्वतः माध्यमांसमोर माझी बाजू मांडेन. तोपर्यंत कृपया संयम बाळगा”, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, न्यायमूर्ती शर्मा यांनी ताज्या पत्रातील आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही.
