शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या ७६ व्या आमसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. या आमसभेतून त्यांनी विविध विषयांवर मतं माडलं. या भाषणानंतर केंद्रीय मंत्र्यांसह अनेक नेत्यांनी जागतिक स्तरावर मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेच्या भेटीतील शेवटच्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी यूएनजीएमधील मोदींचे भाषण होते. याआधी त्यांनी अनेक व्यापारी नेते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांची भेट घेतली होती.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेपुढे हिंदीत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी, लोकशाही मूल्ये, भारताची आर्थिक प्रगती, करोना विषाणू साथीनंतरची जागतिक अर्थव्यवस्था, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, अफगाणिस्तानातील राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं. अफगाणिस्तानची भूमी दहशतवादाचा फैलाव करण्यासाठी किंवा दहशतवादी कृत्यांसाठी वापरली जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे असे अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत बोलताना मोदी म्हणाले.

यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांचे भाषण “उत्कृष्ट” असल्याचे म्हटले. “आज यूएनजीए मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्कृष्ट भाषण. त्यांचे भाषण भारतातील १.३ अब्ज लोकांच्या आत्म्याला सामावून घेते. त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या आकांक्षा आणि समृद्ध भारत आणि सुरक्षित करण्याचा आमचा दृढ संकल्प यशस्वीरित्या अधोरेखित केला, ” असे सिंह यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. “संयुक्त राष्ट्रांच्या ७६व्या महासभेत आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे भाषण देशातील १३० कोटी लोकांसाठी अभिमानास्पद आहे. जगभरात भारतीय झेंडा फडकवल्याबद्दल मी पंतप्रधानांचे अभिनंदन करतो, असे नड्डा यांनी म्हटले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधानांच्या भाषणातील एक भाग शेअर केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून गरिबी, कोविड आणि दहशतवादाच्या समस्यांवर लक्ष देण्याची गरज अधोरेखित होते. चाणक्य, दीनदयाल उपाध्याय आणि टागोर यांच्या उल्लेखानुसार “लोकशाही देऊ शकते लोकशाही दिली आहे,” असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही पंतप्रधानांच्या भाषणातील उतारे शेअर केले. यामध्ये मोदींनी भारतातील आरोग्य सेवा आणि कोविड -१९ साथीच्या आजाराविषयी भाष्य केलं होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय तत्त्वज्ञानाची जगाला ओळख करून दिल्याबद्दल मांडवियांनी मोदींचे आभार मानले.

मुख्यमंत्र्यांमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पंतप्रधानांच्या अभिभाषणाबद्दल अभिनंदन केले.

दरम्यान, यावेळी जागतिक नेत्यांपुढे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी केला. काही देश त्यांनाही दहशतवादाचा मोठा धोका आहे, हे माहीत असूनही दहशतवादाचा वापर राजकीय अस्त्र म्हणून करीत आहेत, अशी टीका मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख टाळून केली.