लोकसभा निवडणुकीनंतर विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेले मतदानोत्तर अंदाज (एक्झिट पोल) म्हणजे निव्वळ टाईमपास असल्याचे मत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
ओमर अब्दुल्ला आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणतात की, “शुक्रवारी जाहीर होणारे निकालच महत्वाचे असणार आहेत. त्याआधीच व्यक्त करण्यात आलेले अंदाज हा निव्वळ टाईमपास आहे. काल वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये एका वाहिनीने राजस्थानमध्ये काँग्रेसला केवळ दोन जागा मिळतील असे म्हटले, तर दुसऱया वाहिनीने काँग्रेसला १४ जागांवर यश मिळण्याची शक्यता असल्याचे वर्तविले. त्यामुळे एक्झिट पोलवर विश्वास ठेवता येणार नाही.” असेही ते पुढे म्हणाले.
एक्झिट पोलच्या माध्यमातून वाहिन्यांनी जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार, यावेळी ‘एनडीए’ला स्पष्ट बहुमत मिळून ‘यूपीए’चा दारूण पराभव होणार असल्याचे वर्तविले आहे. याबद्दल ओमर अब्दुल्ला आपले मत व्यक्त करत होते.