पीटीआय, बलौदा बाजार

छत्तीसगडच्या बलौदा बाजार येथील एका पोलाद कारखान्यात स्फोट होऊन गरम राख अंगावर पडल्याने ६ कामगारांचा मृत्यू, तर ५ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. मृतांमध्ये बहुतांश जण बिहार आणि झारखंडमधील आहेत.

बाकुलाही गावातील रिअल इस्पात अँड पॉवर लिमिटेड कंपनीत ही घटना घडल्याचे जिल्हाधिकारी दीपक सोनी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. सकाळच्या सत्रात कंपनीत ४० ते ५० कामगार कार्यरत होते. या वेळी भट्टीला जोडलेल्या आणि उच्च-तापमानाची राख वाहून नेणाऱ्या ‘डस्ट सेटलिंग चेंबर’मध्ये (डीएससी) स्फोटानंतर गळती झाली. या गळतीमुळे गरम राख काही कामगारांवर पडली. तिच्या उच्च तापमानामुळे सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले, अशी माहिती सोनी यांनी दिली.

जखमी कामगारांना बिलासपूर येथील छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने परिसर सील केला. या घटनेच्या चौकशीसाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.