scorecardresearch

माओवाद्यांकडून स्फोट, जाळपोळ

 माओवाद्यांनी सर्वप्रथम खुखरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एअरटेलच्या एका टॉवरला आग लावली.

प्रतिनिधिक छायाचित्र

गिरिडीह :  झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात माओवाद्यांनी शनिवारी मध्यरात्री एक मोबाईल फोन टॉवर स्फोटाने उडवून दिला, तर दुसऱ्याला आग लावली. आपला उच्चपदस्थ नेता प्रशांत बोस याच्या अटकेच्या विरोधात माओवादी साजरा करत असलेल्या ‘प्रतिकार सप्ताहाच्या’ पहिल्या दिवशी या घटना घडल्या.

 माओवाद्यांनी सर्वप्रथम खुखरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एअरटेलच्या एका टॉवरला आग लावली. दोन माओवादी मोटारसायकलवर घटनास्थळी आले व त्यांनी हा टॉवर पेटवून दिला. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास माओवाद्यांनी जैनधर्मीयांचे धार्मिक स्थळ असलेल्या मधुबन येथील आयडियाचा एक टॉवर स्फोटाने उडवून दिला, अशी माहिती डुमरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज कुमार यांनी दिली.

 माओवाद्यांचा आता जनाधार उरलेला नसल्यामुळे निराशेपोटी ते अशी हिंसाचाराची कृत्ये करत आहेत. या घटनेनंतर या भागातील माओवाद विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे, असेही कुमार यांनी सांगितले.

 शिरावर १ कोटी रुपयांचे इनाम असलेल्या प्रशांत बोस ऊर्फ किशन दा याला त्याची पत्नी शीला मरांडी हिच्यासह झारखंडमध्ये अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला झारखंड पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये दुजोरा दिला होता. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील माओवादी कारवायांचा तो प्रभारी होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explosions arson by maoist resistance week akp

ताज्या बातम्या