नवी दिल्ली : भारताचा मार्ग हा विध्वसंक नसून तो तटस्थतेपेक्षा निर्णायक भूमिकेवर भर देणारा आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी रायसीना संवादात सांगितले.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने मोठी भूमिका पार पाडावी अशी अनेक देशांची अपेक्षा आहे त्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी सांगितले की, भारताने कधीच व्यापारी तसेच उथळ दृष्टिकोन अवलंबलेला नाही. इराण व अमेरिका यांच्यातील संघर्षांबाबत ते म्हणाले की, यात सरतेशेवटी काय होणार हे त्या दोन देशांवरच अवलंबून आहे.
चीनच्या मुद्दय़ावर ते म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर मतैक्य गरजेचे आहे. भारत किंवा चीन या दोन्ही देशांना संबंध बिघडवून चालणार नाहीत कारण ते खूपच वेगळ्या स्वरूपाचे आहेत. प्रत्येक देश जगाला एकाचवेळी सामोरा जात आहे त्यामुळे दोन्ही देशात समतोल असणे गरजेचे आहे. भारत आता त्याच्या पूर्वीच्या प्रतिमेचा बंदी राहिलेला नाही. त्यातून तो बाहेर पडत आहे. भारताची भूमिका ही विध्वंसक नाही, भारत व्यापारी वृत्तीचाही नाही. भारत आता निर्णायक भूमिका घेण्यात पुढे आहे तटस्थ राहण्याचे त्याने सोडून दिले आहे. हवामान बदलात भारताने ठोस भूमिका घेतली होती हे त्याचेच उदाहरण आहे.
दी इंडिया वे- प्रिपेरिंग फॉर अ सेंच्युरी ऑफ ग्रोथ अँड कंटेस्ट या विषयावर ते बोलत होते. भारत दहशतवादाचा ठोसपणे मुकाबला करीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, पूर्वी आम्ही जास्त बोलत होतो व कृती कमी करीत होतो, आता नेमकी उलटी परिस्थिती आहे. आरसेपमधून माघार घेण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले की, भारत आरसेपमधून बाहेर पडण्यास इतर देशांनी घेतलेली ताठर भूमिका हे कारण आहे. आरसेपमध्ये आम्ही जोखीम व फायदा यांचा विचार करीत आहोत. आरसेपचे आर्थिक व व्यापारी फायदे तोटे आम्ही तपासून पाहू. आम्ही आरसेपमध्ये सहभागी व्हायचेच नाही असा कायमचा निर्णय घेतलेला नाही. भारत व अमेरिका आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात भागीदारीने काम करीत आहेत. जगात आज अनेक आव्हाने सामायिक आहेत त्यात दहशतवादाचे आव्हान मोठे असून फुटीरतावाद, स्थलांतर ही आव्हाने सगळ्याच देशांपुढे आहेत. जगाने या आव्हानांचा मुकाबला कसा करणार हे ठरवले पाहिजे. त्याचा सर्व अंगांनी विचार करावा लागेल.
रायसीन संवाद मंगळवारपासून सुरू झाला असून त्यात रशिया, इराण, ऑस्ट्रेलिया., मालदीव, दक्षिण आफ्रिका, एस्टोनिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, लॅटव्हिया, उझबेकीस्तान, युरोपीय समुदाया यांचे मंत्री सहभागी आहेत.
