पीटीआय, कुवेत
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी कुवेतचे पंतप्रधान शेख मोहम्मद सबाह अल-सालेम अल-सबाह आणि प्रिन्स शेख सबाह अल-खालेद अल-सबाह यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. एकदिवसीय दौऱ्यासाठी जयशंकर रविवारी कुवेतमध्ये दाखल झाले. या वेळी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांनी त्यांचे स्वागत केले. जयशंकर यांच्या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेता येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने भेटीपूर्वीच्या निवेदनात म्हटले आहे.
जयशंकर यांनी भारत-कुवेत संबंध अधिक दृढ करण्याबाबत शेख सबाह यांच्या दृष्टिकोनांची प्रशंसा केली. पंतप्रधान शेख डॉ. मौहम्मद सबाह अल-सालेम अल-सबाह यांना भेटून आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छाही दिल्या, असे जयशंकर यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे. पुढील आर्थिक सहकार्याच्या संदर्भात त्यांच्या मतांची कदर केली जाईल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी जयशंकर यांनी प्रिन्स शेख सबाह अल-खालेद अल-सबाह यांची भेट घेतली. आमच्या संबंधांना उच्च पातळीवर नेण्याबाबत त्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि अंतर्दृष्टीबद्दल आभार, असे जयशंकर म्हणाले.
जयशंकर यांच्या दौऱ्यामुळे भारत-कुवेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेता येईल. यामध्ये राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा, सांस्कृतिक, वाणिज्य दूत, तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
कुवेतचे शेख मोहम्मद सबाह अल-सालेम अल-सबाह आणि प्रिन्स शेख सबाह अल-खालेद अल-सबाह यांची भेट घेतली. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. भारत आणि कुवेत यांच्यातील मैत्रीचे जुने ऋणानुबंध कायम आहेत. दोन्ही देशांतील भागीदारीही विस्तारत आहे.- एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री