भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्हेनेझुएलातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारताचे व्हेनेझुएलाबरोबर बऱ्याच वर्षांपासून चांगले संबंध आहेत, असे एस. जयशंकर म्हणाले. लक्झेंबर्ग मधील एका कार्यक्रमात एस. जयशंकर यांनी अमेरिका व व्हेनेझुएलामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर मंगळवारी विधान केले. दोन्ही देशांनी एकत्र बसून या समस्येवर तोडगा काढला पाहिजे, असे आवाहन एस. जयशंकर यांनी केले आहे. ३ जानेवारीला रात्री अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला केला. तसेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना अटक करून न्यूयॉर्कला नेले.

एस. जयशंकर म्हणाले, “मला वाटतं काल (सोमवारी) आम्ही याबाबत एक निवेदन जारी केलं. व्हेनेझुएलातील बदलत्या परिस्थितीबाबत आम्हाला चिंता आहे. व्हेनेझुएलाशी संबंधित सगळ्यांनी बसून चर्चा करायला हवी. चर्चेतून या समस्येवर तोडगा काढायला हवा. जो व्हेनेझुएलातील नागरिकांच्या हिताचा असेल. तसेच त्यांना सुरक्षा प्रदान करेल. अखेर आमच्यासाठी तेच महत्वाचं आहे.” एस. जयशंकर यांनी व्हेनेझुएलातील नागरिकांचे हित व सुरक्षा भारतासाठी महत्वाची असल्याचे म्हटले आहे.

एस. जयशंकर म्हणाले, “भारताला व्हेनेझुएला एक देश म्हणून हवा आहे. व्हेनेझुएलाशी आमचे खूप वर्षांपासून चांगले संबंध आहेत. व्हेनेझुएलातील परिस्थिती कशीही असली तरी तिथल्या नागरिकांना घराबाहेर पडता आले पाहिजे” दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी केले आहे. व्हेनेझुएलातील बदलत्या परिस्थितीबाबत भारताला चिंता असून त्याकडे भारत बारीक लक्ष ठेवून असल्याचे निवेदनात नमूद होते.

“व्हेनेझुएलातील नागरिकांची सुरक्षा व हित जोपासण्याला भारताचा पाठिंबा आहे. या समस्येवर चर्चेतून शांततेत तोडगा निघावा, तसेच त्या भूभागात शांतता व स्थिरता यावी अशी भारताला अपेक्षा आहे. कराकस मधील भारतीय दूतावास व्हेनेझुएलातील भारतीयांच्या संपर्कात आहे. त्यांना शक्य तेवढी मदत पुरवली जाईल.”, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले होते. गरज नसल्यास भारतीयांनी व्हेनेझुएलात जाणे टाळावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना केले आहे.

मादुरो अमेरिकन न्यायालयात काय म्हणाले ?

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेतील न्यायालयात निष्पाप असल्याचे म्हटले आहे. “मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे. मी माझ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. निष्पाप आहे. माझ्यावर केलेल्या आरोप मला मान्य नाहीत. मी दोषी नाही.”, असे निकोलस मादुरो न्यायालयात म्हणाले. ड्रग्ज तस्करी, नार्को-दहशतवाद, तसेच अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कोकेन हे ड्रग्ज पाठवल्याचा आरोप मादुरो यांच्यावर आहे. मादुरो यांच्या पत्नी सीलिया यांनीही आपण निष्पाप असल्याचे म्हटले आहे.