परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पुढच्या आठवड्यात अमेरिकेत जाणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. २४ मे ते २८ मे दरम्यान परराष्ट्रमंत्री अमेरिका दौऱ्यावर असतील. या ४ दिवसांच्या भेटीत भारतातील लसीकरण उत्पादनात सहभागी असलेल्या अमेरिकेतील विविध संस्थाशी ते चर्चा करतील. अमेरिकेनं करोना लढाईत भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. ऑक्सिजन कन्सेन्ट्रेटर, रेमडेसिवीरसारखी महत्त्वपूर्ण औषधं अमेरिकेनं भारताला दिली आहेत.सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियालाही लस निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला आहे. त्यामुळे कोविशील्डचं उत्पादन सुरु आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या दौऱ्यात अमेरिकेतून लस खरेदीवरही चर्चा कण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं यापूर्वीच ८० दशलक्ष करोना लशींचे डोस गरजू देशांना देण्याचं जाहीर केलं आहे. अमेरिकेकडे  फायझर, मॉर्डन लशींचा पुरेसा साठा आहे.

यापूर्वी भारताने लशींवरील बौद्धिक संपदा हक्का रद्द करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. अमेरिकेनं भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने लशींवरील बौद्धिक संपदा हक्क माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. करोना लशींवरील बौद्धिक संपदा हक्क रद्द करण्याची मागणी भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं केली होती. त्याला अमेरिकेनं समर्थन दिलं आहे.

सूक्ष्म तुषारांचा धोका १० मीटरपर्यंत

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या महिन्यात ब्रिटनचा दौरा केला होता. जी ७ राष्ट्रांच्या बैठकीत त्यांनी ३ मे रोजी सहभाग घेतला होता. त्यानंतर ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी त्यांनी करोना संदर्भातील विविध उपाययोजनांवर चर्चा केली होती.