तैवानच्या राष्ट्रीय दिनी शुभेच्छा दिल्याबद्दल तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन यांनी भारतीयांचे आभार मानले आहेत. भारत सरकारने अधिकृतपणे राष्ट्रीय दिनाबद्दल तैवानला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. पण सोशल मीडियावरुन तैवानला मोठया प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या. चीनने तिबेट ज्या प्रमाणे बळकावले, तसाच त्यांना तैवानचाही घास घ्यायचा आहे. चीन तैवानला आपलाच भाग मानतो. पण तैवानला चीनचा हा दावा मान्य नाही. तैवानमध्ये स्वतंत्र लोकशाही विचार मानणारी जनता मोठया प्रमाणावर आहे.

“तैवानच्या राष्ट्रीय दिनी शुभेच्छा दिल्याबद्दल भारतातील सर्व मित्रांचे आम्ही आभार मानतो” असे तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. तैवानचा राष्ट्रीय दिन १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी भारताला तैवानचा राष्ट्रीय दिवशी (Taiwan National Day) या प्रदेशाचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून करुन नये असा इशारा दिला होता.

आणखी वाचा- ‘खड्ड्यात जा’: तैवानचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख न करण्याच्या चीनच्या इशाऱ्यावर सडेतोड उत्तर

आणखी वाचा- चीन लोकशाहीसाठी गंभीर आव्हान; भारतासोबत संघर्ष मोठं उदाहरण : तैवान

तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे, हे सत्य बदलता येणार नाही, असा इशारा शनिवारी भारतातील चिनी दूतावासाने तैवानला दिला होता. चीनचा भारताप्रमाणेच तैवान बरोबरही वाद सुरु आहे. चीनकडून तैवानला सातत्याने युद्धाचे इशारे दिले जातात. पण तैवानने आता चीनच्या दादागिरीला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तैवानला अमेरिकेची भक्कम साथ मिळाली आहे. त्यामुळे चीन तिळपापड होत आहे.