“..म्हणून पुढील सहा महिन्यात वीजटंचाईचा सामना करावा लागू शकतो”; नितीन गडकरींनी केले स्पष्ट

भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर अवलंबून नसलेला देश बनवण्याची गरज आहे असेही गडकरी यांनी म्हटले आहे

face power shortage in the next six months Nitin Gadkari
(File Photo: PTI)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनबाबत भाष्य करताना आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला आहे. सोमवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर अवलंबून नसलेला देश बनवण्याची गरज आहे. तसेच नितीन गडकरी यांनी पुढील सहा महिन्यात वीजटंचाईचा सामना करावा लागू शकतो असेही म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एरोसिटीमध्ये आंतरराष्ट्रीय वैष महासंमेलनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशाच्या विकासासाठी सरकारकडून तयार करण्यात येत असलेल्या रोडमॅपवर सविस्तर माहिती दिली. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणाले की, पुढे जायचे असेल तर तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी देशापुढे उभ्या राहिलेल्या वीजेच्या संकटावरही भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने वीज निर्मिती केंद्राकडे जेमतेम काही दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा उपलब्ध होता. यामुळे केंद्रीय ऊर्जा विभागाने युद्धपातळीवर आढावा बैठका घेत कोळसा उपलब्धीसाठी प्रयत्न करत केले होते. त्यामुळे देशासमोर उभे असलेले वीजेचे संकट काही प्रमाणात टळले होते.

त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजेच्या संकटाबाबत भाष्य केले आहे. “सरकारी डिस्कॉम्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. नजीकच्या भविष्यात भारताला अधिक शक्तीची गरज भासणार आहे कारण देशाच्या आर्थिक विकासाला वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात वीजटंचाईचा सामना करावा लागू शकतो,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

ऊर्जा विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार ३ लाख ८८ हजार मेगावॅट एवढी देशात वीजेची मागणी आहे. यापैकी सरासरी ५२ टक्क्यांपेक्षा जास्त वीज म्हणजे सुमारे २ लाख २ हजार मेगावॅट वीजेची निर्मिती ही निव्वळ कोळशापासून केली जाते. देशातील एकूण गरजेपैकी सुमारे ३० टक्के कोळसा हा आयात केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांत युरोपमध्ये विशेषतः चीनमधून कोळशाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कोळशाच्या किंमतीही काही प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच देशांत अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी, आलेला पूर याचा परिणाम कोळशा खाणींवर झाला आहे आणि कोळशाच्या वाहतुकीवरही मर्यादा आल्या आहेत.

या सर्व परिस्थितीचा फटका हा कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना बसला आहे. तसेच ऑक्टोबर मध्ये दरवर्षीप्रमाणे वीजेची मागणी ही वाढली. या सर्व गोष्टीमुळे यापुढील दिवसांत देशात वीजेच्या उपलब्धतेवर संकट येण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Face power shortage in the next six months nitin gadkari abn