Facebook Down: जगभरातील युझर्सना तांत्रिक अडचणीचा फटका

Facebook Down: इन्स्टाग्राम युजर्सनाही अशाच अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Facebook Down
प्रतिकात्मक छायाचित्र

Facebook Down: बुधवारी सकाळी गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचण आल्याचा प्रकार ताजा असतानाच  रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील युझर्सनाही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. फेसबुकवर “Down for required maintenance” असा संदेश झळकत असून इन्स्टाग्राम युझर्सनाही अशाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी देखील अनेक युझर्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. इतके तास फेसबुकवर तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

बुधवारी रात्री भारतासह जगभरातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युझर्सना पोस्ट करताना आणि अकाऊंट लॉग इन करताना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. फेसबुकवर लॉग इन करता येत नसून फेसबुककडून दिलगिरी व्यक्त करणारा संदेश स्क्रीनवर झळकत आहे. “फेसबुक सध्या देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी बंद असून लवकरच सेवा पूर्ववत होईल. तुम्ही दाखवलेल्या संयमासाठी धन्यवाद”, असे यात म्हटले आहे.

काही जणांच्या मोबाईल अॅपवर फेसबुक सुरू असले तरी फोटो किंवा मजकूर अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. भारतासह अमेरिकेतील वॉशिंग्टन, सिएटल भाग, लॅटिन अमेरिका, ब्रिटन मधील काही शहरांत सेवेत अडचणी येत आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत हीच परिस्थिती होती.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद असल्याने ट्विटरवर अनेक युझर्सनी राग व्यक्त केला. तर काहींनी यावरुन ट्विटरवर विनोदही ट्विट केले. आता माझ्या फोनचा वापर फक्त शॉपिंगसाठीच करता येणार, असे एका युझरने म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम झाला होता. या सेवा पूर्ववत होऊन काही तासांचा अवधी झाला असतानाच फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झाल्याने बुधवारचा दिवस नेटिझन्ससाठी तापदायक ठरला. आता गुरुवारी सकाळी तरी फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्ववत होईल, अशी आशा अनेकांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Facebook instagram down across world for required maintenance