२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून अल्पसंख्याक-विरोधी आणि मुस्लिम-विरोधी पोस्टमध्ये वाढ झाल्याचे गेल्या दोन वर्षांतील फेसबुकच्या अनेक अंतर्गत अहवालातून समोर आले आहे. जुलै २०२० च्या अहवालात विशेषत: मागील १८ महिन्यांत अशा पोस्टमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पश्चिम बंगालसह आगामी विधानसभा निवडणुकीत ही भावना वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची शक्यता होती.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान अल्पसंख्याक विरोधी आणि मुस्लिम विरोधी वक्तृत्व असलेल्या पोस्टमध्ये रेड फ्लॅग वाढले आहेत. फेसबुकवर कोणत्याही द्वेषपूर्ण पोस्टला रेड फ्लॅग दिला जातो. असे चिन्हांकित करणे म्हणजे धोक्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, रेड फ्लॅग च्या माध्यमातून लोकांना ती पोस्ट टाळण्यासाठी संदेश दिला जातो. हा अहवाल युनायटेड स्टेट्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) कडे नोंदवलेल्या दस्तऐवजांचा भाग आहे. अमेरिकन काँग्रेसकडून प्राप्त झालेल्या सुधारित आवृत्त्यांचे द इंडियन एक्सप्रेससह जागतिक वृत्तसंस्थांनी पुनरावलोकन केले.

२०२१ मध्ये आसाममधील विधानसभा निवडणुकीपूर्वी, एका अंतर्गत अहवालात असा दावा करण्यात आला होता की आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना देखील चिथावणीखोर आणि अफवा पसरवल्याबद्दल फेसबुकवर (रेड फ्लॅग) चिन्हांकित करण्यात आले होते. मुस्लिम आसाममधील लोकांवर जैविक हल्ल्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यकृत, किडनी आणि हृदयाशी संबंधित आजार उद्भवतात असे म्हटले गेले होते.

द इंडियन एक्स्प्रेसने हेमंत बिस्वा शर्मा यांना द्वेषाने भरलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या समर्थकांच्या सहभागाबद्दल विचारले. यावर शर्मा यांनी मला याबद्दल काहीच माहिती नव्हती असे म्हटले. दुसरीकडे, फेसबुकने त्याच्या पेजवर पोस्ट केलेल्या पोस्टवर आलेल्या रेड फ्लॅगबाबत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारले होते का, असे विचारले असता माझ्याशी त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही, असे शर्मा म्हणाले.

भारतातील सांप्रदायिक संघर्ष नावाच्या दुसर्‍या अंतर्गत फेसबुक अहवालात असे म्हटले आहे की इंग्रजी, बंगाली आणि हिंदी भाषेतील प्रक्षोभक मजकूर अनेक वेळा पोस्ट केला गेला. विशेषत: डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू झाली तेव्हा आणि मार्च २०२० कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला तेव्हा यामध्ये वाढ झाली.

दरम्यान, अशा जवळपास सर्वच अहवालांनी भारताला धोका असलेल्या देशांच्या (ARC) श्रेणीत टाकले आहे. यानुसार, भारतात सोशल मीडिया पोस्टमधून सामाजिक हिंसाचाराचा धोका इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.