नाव बदलानंतर फेसबुकचा दुसरा मोठा निर्णय, फोटो आणि व्हिडीओसाठीचं ‘हे’ फिचर बंद होणार

फेसबुकने आपल्या मूळ कंपनीचं नाव बदल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेतलाय.

फेसबुकने (Facebook) आपल्या मूळ कंपनीचं नाव बदल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेतलाय. यानुसार फेसबुकवरील चेहरा ओळखीच्या स्वयंचलित तंत्रज्ञानाचा म्हणजेच ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’ (Auto Face recognition system) वापर बंद केला जाणार आहे. यामुळे फेसबुकवर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड झाला की त्यात कोण व्यक्ती आहेत हे आपोआप ओळखणं आणि त्या व्यक्तींना टॅग करण्याबाबतचे नोटिफिकेशन बंद होणार आहे.

फेसबुकवर ज्या वापरकर्त्यांनी ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’चा पर्याय निवडलेला त्यांचं काय?

फेसबुकने ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. यानंतर फेसबुकवरील फोटोज आणि व्हिडीओमध्ये आपोआप टॅगिंग सुरू झालं. हा अनुभव वापरकर्त्यांसाठी नवा होता. त्यामुळे सुरुवातीला अनेक वापरकर्त्यांनी फोटो आणि व्हिडीओत स्वतःला आपोआप टॅग करून घेण्यासाठी हे फिचर वापरण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक डेटा वापरण्याची फेसबुकला परवानगी दिली.

फेसबूक ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’चा डेटा डिलीट करणार

फेसबुकच्या या निर्णयानंतर आता ज्या वापरकर्त्यांनी आधी ऑटो फेस रिकॉग्निशनलला परवानगी दिली होती होती त्यांचंही आपोआप टॅगिंग बंद होणार आहे. याशिवाय यापूर्वी ऑटो फेस रिकॉग्निशनसाठी गोळा करण्यात आलेल्या चेहऱ्यांचा कोट्यावधी लोकांचा डेटा देखील फेसबूक डिलीट करणार आहे.

फेसबुकने हा निर्णय का घेतला?

या तंत्रज्ञानाच्या वापरातील नैतिकतेबाबत उपस्थित होत असलेले प्रश्न आणि त्यातील वाढते धोके लक्षात घेत फेसबुकने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. मात्र, याला मागील काळात फेसबुकवर झालेल्या अनेक गंभीर आरोपांचीही पार्श्वभूमी आहे.

मागील काही काळापासून फेसुबकवर अनेक गंभीर आरोप झालेत. त्यातच फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्यांनीही फेसबुकचा डेटा लीक करत या आरोपांना दुजोरा देणारी माहिती समोर आणली. त्यामुळे अनेक देशातील सरकारांकडून फेसबुकवरील नियंत्रणावर पुन्हा विचार सुरू झालाय.

हेही वाचा : “मार्कच फेसबुकचा CEO राहिला तर…”; FB च्या माजी महिला कर्मचाऱ्याने केली झुकरबर्गच्या राजीनाम्याची मागणी

या पार्श्वभूमीवर फेसबुकवर प्रचंड दबाव वाढला आहे. त्यातच ऑटो फेस रिकॉग्निशनमुळे अनेकांनी खासगीपणाचा (Privacy) भंग होत असल्याचाही आरोप केला. तसेच यामुळे हेरगिरी आणि पाळत ठेवण्याचा धोका वाढल्याचंही टीकाकारांचं म्हणणं होतं. त्यामुळेच एकूणच तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिकता ठेवण्याच्या आग्रहापोटी फेसबुकने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.

“ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञानाच्या वापरावर मर्यादा ठेवणं हेच उचित आहे”

फेसबुकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे उपाध्यक्ष जेरोम पेसेंटी यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटलं, “नियंत्रक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतने फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान वापराबाबत काही ठोस नियम तयार करण्यावर नियंत्रक अद्याप काम करत आहेत. या अनिश्चिततेच्या काळात ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञानाच्या वापरावर मर्यादा ठेवणं हेच उचित आहे.”

जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनलेल्या फेसबुकने हा निर्णय घेतल्यानंतर जगभरात याची अंमलबजावणी होणार आहे. डिसेंबर अखेर हे तंत्रज्ञान काढण्याचं काम पूर्ण केलं जाणार आहे.

ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान दुकानं, व्यावसायिक ठिकाणं आणि रुग्णालयांमध्ये सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. याशिवाय सुरक्षा यंत्रणाही सीसीटीव्ही फुटेजसोबत याचा वापर करतात. मात्र, हे तंत्रज्ञान वापरल्यास खासगीपणाचा भंग, अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणं आणि पाळतीसाठी घुसखोरीचं सामान्यीकरण होईल, असा आरोप टीकाकार करतात. फेसबुकवर या तंत्रज्ञानाचा वाप करून शोषण झाल्याचीही अनेक उदाहरणं समोर आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facebook take big decision regarding photos and videos face recognition pbs

ताज्या बातम्या