सोशल मीडियाचा वापर हा प्रकार आता सगळ्यांसाठी अगदीच सवयीचा झाला आहे. घरांघरांमध्ये स्मार्ट फोन जाऊन पोहचलाय. अशातच फेसबुक ते इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सचा वापर तासाभरासाठी बॉयफ्रेंड भाडे तत्त्वावर घेण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. Renting-A-Boyfriend हा नवा ट्रेंड आता भारतात चांगलाच रुळतोय.
नेमकं काय घडतं?
महिलेनं तिला आवडलेल्या एखाद्या पुरुषाचं प्रोफाइल निवडायचं. वेळ निवडायची आणि त्यानुसार बॉयफ्रेंड भाडे तत्वावर घ्यायचा. या महिला त्याच्यासह चित्रपट पाहायला जातात, त्या बॉयफ्रेंडला खरेदीला घेऊन जातात, कॉफी प्यायला, डिनरला, लंचला घेऊन जातात. एकटेपणा घालवण्यासाठी हा नवा ट्रेंड उदयास आला आहे. तासाप्रमाणे पैसे त्या व्यक्तीला दिले जातात. आत्तापर्यंत या गोष्टी जपानमध्ये होत होत्या. आता त्या जगभरासह भारतातही होऊ लागल्या आहेत. फेसबुक ग्रुप्स, इन्स्टाग्राम पेजेस, डेटिंग अॅप्स आणि ऑनलाइन प्रोफाइल मार्केटप्लेसवर आता ‘मूव्ही पार्टनर’, ‘शॉपिंग बडी’, ‘कॉफी कंपॅनियन’ किंवा ‘मेडिकल सपोर्ट कंपॅनियन’ अशा सेवांची तासाच्या दराने जाहिरात केली जात आहे.
रेंट अ बॉयफ्रेंडची सुरुवात नेमकी कशी झाली?
रेंट अ बॉयफ्रेंड ही संकल्पना काही अलिकडची नाही किंवा ती सोशल मीडियामुळे सुरु झालेली नाही. जपानमध्ये १९९० च्या दशकात रेंटल पर्सन इकॉनॉमीत याचा उदय झाला आहे. त्यावेळी जपानमध्ये काही लोक मित्र, ऐकून घेणारी व्यक्ती, कौटुंबिक किंवा सामाजिक सोहळ्यांमध्ये साथ लाभावी म्हणून जोडीदार हे भाडेतत्त्वांवर घेत असत. आता हा ट्रेंड जगभरात पोहचला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जाहिरात केली जाते आहे. साधारण २०१० च्या नंतर या संकल्पनांना रेंटल बॉयफ्रेंड किंवा रेंटल गर्लफ्रेंड अशी नावं मिळाली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
रेंटल बॉयफ्रेंड म्हणजे नेमकं काय?
रेंटल बॉयफ्रेंड असं या ट्रेंडचं नाव असलं तरीही हा ट्रेंड शरीरसंबंध, वेश्यावृत्ती याच्याशी संबंधित नाही. रेंटल बॉयफ्रेंड किंवा रेंटल गर्लफ्रेंड हे त्यांच्या ग्राहकांना सार्वजनिक ठिकाणी भेटतात. ही भेट कॅफे, एखादी बाग, संग्रहालय, रेस्तराँ, शॉपिंग मॉल, सिनेमागृह अशा ठिकाणी होऊ शकते. ज्या एजन्सींच्या मदतीने रेंटल बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड धाडले जातात त्यांच्यासाठी नियमावलीही असते.
काय असते नियमावली?
१) रेंटल बॉयफ्रेंड लैंगिक संबंध प्रस्थापित करणार नाहीत
२) रेंटल बॉयफ्रेंडला घेऊन हॉटेलच्या रुममध्ये जाण्यास मनाई
३) निर्जन ठिकाणी रेंटल बॉयफ्रेंडला नेता येणार नाही
४) रेंटल बॉयफ्रेंड हा काही तासांसाठी भाडे तत्त्वावर घेता येईल. रात्रभर मुक्कामासाठी नाही
५) रेंटल बॉयफ्रेंड आणि त्याला निवडणारी महिला या दोघांचं वर्तन आदरपूर्वक असणं आवश्यक
रेंटल बॉयफ्रेंड या संकल्पनेचा अर्थ असा आहे की संवाद साधण्यासाठी काही काळ सहवास मिळावा म्हणून महिला ग्राहक पैसे देतात. अनेक लोक या संकल्पनेला भावनिक गरजांसाठी व्यावसायिक सहवास असंही म्हणतात.
जपानमध्ये बॉयफ्रेंड ऑन रेंट ही सेवा लोकप्रिय का झाली?
बाहेरच्या देशांतील लोकांना ही कल्पना विचित्र वाटू शकते. मात्र जपानी सामाजिक परिस्थितीत ती काही अंशी समजण्यासारखी आहे.
जपानी संस्कृतीत स्वतःच्या भावना उघडपणे व्यक्त न करणे, इतरांवर भावनिक भार न टाकणे आणि औपचारिकता राखणे याला महत्त्व दिले जाते.
त्यामुळे अनेकांना मित्रांपेक्षा अशा ठरावीक भूमिकेत असलेल्या व्यक्तीशी बोलणे अधिक सोयीचे वाटते.
तसंच जपानमध्ये एकटे राहणाऱ्यांची वाढती संख्या, कामाचे व्यग्र वेळापत्रक,
शहरांतील लोकांचा वाढता एकटेपणा, कमी तणावाचा सामाजिक सहवास या कारणांमुळेही लोकांना रेंट अ बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड ही संकल्पना जपानमध्ये लोकांच्या पसंतीस पडते आहे.
