शीख यात्रेकरूंच्या सोयीसाठी गुरदासपूर-आयबी मार्गिका भारत बांधणार

भारत-पाकिस्तान सीमेवर अत्यंत शक्तिशाली टेलिस्कोप बसविण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानातील रावी नदीच्या तीरावरील गुरुद्वारा दरबार साहिब कर्तारपूर येथे शीख यात्रेकरूंना जाणे सुलभ व्हावे यासाठी भारत पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्य़ातील डेरा बाब नानकपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत (आयबी) एक मार्गिका बांधून विकसित करणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी येथे सांगितले.

कर्तारपूर साहिब आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शीख समाजाच्या भावना लक्षात घेऊन पाकिस्ताननेही आपल्या हद्दीत मार्गिका विकसित करावी, अशी विनंती पाकिस्तानला करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. कर्तारपूर मार्गिकेवर आधुनिक सुविधा असणार असून त्यासाठी लागणारा खर्च केंद्र सरकार करणार आहे. या मार्गिकेमुळे यात्रेकरूंना वर्षभर सहज प्रवासाची सोय होणार आहे. पाकिस्तान सरकारला त्यांच्या हद्दीत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली जाणार आहे, असे गृहमंत्र्यांनी ट्वीट केले आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर अत्यंत शक्तिशाली टेलिस्कोप बसविण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू हजर राहिले होते. कर्तारपूर साहिब मार्गिका पाकिस्तान खुली करण्याची शक्यता आहे असे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी सांगितल्याचा दावा सिद्धू यांनी भारतामध्ये परतल्यानंतर केला होता.

कर्तारपूर मार्गिका खुली करण्याचा पाकिस्तानचा निर्णय

इस्लामाबाद : गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली करीत असल्याचे पाकिस्तानने भारताला कळविले आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी गुरुवारी सांगितले. भारताकडून योग्य प्रतिसाद मिळेपर्यंत आम्ही याहून अधिक काहीही करू शकत नाही, असेही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी कर्तारपूर मार्गिका बांधावी, अशी विनंती भारताने पाकिस्तानला केल्यानंतर काही वेळातच कुरेशी यांनी वरील माहिती दिली. कर्तारपूर साहिब हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल येथे आहे. या पवित्र प्रसंगासाठी आम्ही शीख समाजाचे पाकिस्तानमध्ये स्वागत करतो, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facilitate sikh pilgrims gurdaspur ib route will be built in india

ताज्या बातम्या