उपमुख्यमंत्री पदावर फडणवीस समाधानी!; राज्यातील सत्तांतरनाटय़ात सहभागी भाजप नेत्याचा दावा

राज्यात नवनियुक्त एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर, केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयामुळे प्रदेश भाजपच्या नेत्यांनाही धक्का बसला.

Devendra Fadnavis Eknath Shinde
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महेश सरलष्कर

हैदराबाद : राज्यात नवनियुक्त एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर, केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयामुळे प्रदेश भाजपच्या नेत्यांनाही धक्का बसला. त्यावर, ‘‘फडणवीस हे भाजपचे खंदे कार्यकर्ता आहेत, ते पक्षाच्या आदेशाचे पालन करत आहेत आणि त्यांना दिलेल्या जबाबदारीबद्दल ते खूश आहेत,’’ असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने केला.

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य आणि ज्येष्ठ नेते राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींमध्ये प्रत्यक्ष सहभागी होते. सिकंदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक शुक्रवारी सुरू झाली. या बैठकीमध्ये सामील होण्यासाठी भाजपचे हे नेते सिकंदराबादमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील शिंदे यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असून त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहण्याची शक्यता नाही. मात्र, अधिकृतपणे भाजपने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र भाजपने फडणवीस यांचे जुने भाषण ट्वीट केले. ‘‘मी परत येईन.. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!’’ ही ध्वनिचित्रफीत अजूनही महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर खात्यावर ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भाजपचे नेते म्हणाले की, शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्णय योग्य आहे. शिंदे आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर एकमत आहे. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याच्या नाटय़ासंदर्भात हे नेते म्हणाले की, नड्डा यांनी फडणवीस यांना फोन केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले!

दोन दिवस मोदींची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी कार्यकारिणीच्या प्रत्येक सत्रातील बैठकांना उपस्थित राहणार आहेत. रविवारी कार्यसमितीची बैठक झाल्यानंतर ३४० निमंत्रित पदाधिकाऱ्यांशी मोदी संवाद साधतील. त्यानंतर सिकंदराबादमधील परेड मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे. या सभेपासून भाजपचा तेलंगणामध्ये ‘विजयसंकल्प’ सुरू होईल. २०२३च्या अखेरीस तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून तेलंगण राष्ट्र समितीचे आता अखेरचे दिवस सुरू झाले आहेत, असे तेलंगणाचे प्रभारी तरुण चुग म्हणाले. तेलंगणामध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यालयाबाहेर घडय़ाळ लावले असून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे ‘काऊंट डाऊन’ सुरू झाले आहे. भाजपने ‘बाय बाय केसीआर’चा नारा दिला आहे. भाजपचे सरकार सत्तेवर येण्यासाठी फक्त ५२२ दिवस उरले असल्याचा दावाही चुग यांनी केला. भाजपने तेलंगणामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून ‘चलो दक्षिण’चा संदेश दिला आहे. १८ वर्षांपूर्वी, २००४ मध्ये वाजपेयी-अडवाणींच्या नेतृत्वाखालील भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये झाली होती.

फलकांवर फडणवीसांना स्थान

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकांना फडणवीस उपस्थित राहणार नसले तरी, त्यांचे अप्रत्यक्ष अस्तित्व मात्र कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये उमटण्याची शक्यता आहे. हैदराबाद आणि सिकंदराबादमध्ये  गोलाकार मोठे फलक लावण्यात आले असून ‘दूरदृष्टी’ असलेल्या भाजप नेत्यांमध्ये राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्याही छायाचित्राचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा आणि नितीन गडकरी यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेले फलकही लावण्यात आले आहेत. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fadanvis satisfied deputy chief minister bjp leader claims participated independence drama ysh

Next Story
पाकिस्तानच्या ताब्यात ६८२ भारतीय नागरिक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी