आगामी सहा महिन्यांध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने देखील जोरदार तयारी सुरू केली असून, केंद्रीय मंत्री तसेच, प्रमुख नेत्यांकडे प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमण्यात आलं आहे. तर, केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश हे सहप्रभारी असणार आहेत. दरम्यान, या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला असून, गृहमंत्री अमित शाह व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले की, “आमचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांची काल(बुधवार) नवी दिल्ली येथे भेट घेतली. गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन घेतले. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील पाऊस आणि पूरस्थिती याची तपशीलवार माहिती सुद्धा त्यांनी यावेळी घेतली. गोव्याचे मंत्री मायकेल लोबो यावेळी उपस्थित होते.”

तसेच, “गोवा विधानसभा निवडणुकीबाबत आमचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले.” असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. या ट्विटसोबत भेटीचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत.

दरम्यान, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेले देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. तर, बिहारनंतर गोव्याची जबाबदारी दिल्यामुळे मी पक्षाचे आभार मानतो. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज आमच्यात नाहीत, पण गोव्यातील जनता त्यांनी केलेल्या कामांना विसरणार नाही. असं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे.