करोना महासाथीला तोंड देण्यात कथितरीत्या गोंधळ केल्याबद्दल आणि देशातील करोनामृत्यूंची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवल्याबद्दल अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांना दोषी ठरवले जावे, अशी शिफारस करणारा अहवाल ब्राझीलमधील एका सेनेटरने औपचारिकरीत्या सादर केला आहे.

सेनेटर रेना कॅल्हेइरोस यांचा हा अहवाल सरकारच्या करोना व्यवस्थापनाचा तपास करणाऱ्या समितीच्या सहा महिन्यांच्या कामावर आधारित असून, बुधवारी तो सेनेटच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत उपलब्ध करण्यात आला. ढोंगीपणापासून ते मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यापर्यंत ९ आरोपांसाठी बोल्सोनारो यांना दोषी ठरवले जावे, असे यात म्हटले असल्याचे या समितीच्या दोन सदस्यांनी सांगितले.

२६ ऑक्टोबरला होणाऱ्या समितीच्या मतदानापूर्वी या अहवालात दुरुस्ती केली जाऊ शकते आणि यापैकी बहुतांश आरोप ठेवायचे अथवा नाही हे अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या ब्राझीलच्या मुख्य सरकारी वकिलांवर अवलंबून राहणार आहे.