Fake Army Brigadier arrested: उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे एका तोतया ब्रिगेडिअरला अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराला २१ वर्षीय तोतया ब्रिगेडिअरबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा लावण्यात आला होता. शुक्रवारी (१२ जून) शहाजहानपूर कॅन्टोनमेंट भागातून त्याला अटक करण्यात आली. आरोपीचे नाव आर्यन वर्मा आहे. भारतीय सैन्यात एक वरिष्ठ अधिकारी असल्याचे तो इतरांना सांगत होता. तसेच भारतीय लष्कराच्या गणवेशात तो फिरायचा.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्यन वर्मा हा भारतीय सैन्यात वरिष्ठ अधिकारी असल्याचा दावा करत होता. तसेच तो ब्रिगेडिअरच्या गणवेशात फिरायचा. भारतीय लष्कराला आर्यनबाबत एप्रिल महिन्यात माहिती मिळाली होती. आर्यनला पकडण्यासाठी लष्कराने नियोजन केले व त्याला ब्रिगेडिअरच्या गणवेशातच पकडले.
तोतया ब्रिगेडिअरला कसे पकडले?
भारतीय सैन्याच्या जवानांनी सामान्य नागरिक बनून तोतया ब्रिगेडिअरशी संपर्क साधला. भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी त्यांनी तोतया ब्रिगेडिअरकडे केली. कॅन्टोनमेंट भागात असलेल्या शहीद म्युझियममध्येच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शुक्रवारी तोतया ब्रिगेडिअर आर्यन वर्मा त्याच्या एसयूव्ही (हॅरियर) कारमधून कार्यक्रमस्थळी पोहोचला. त्याने सैन्यातील ब्रिगेडिअरचा गणवेश परिधान केला होता. त्यावेळी सैन्याच्या जवानांनी वर्माला अटक केली. वर्माच्या ड्रायव्हरकडून वर्माचे ब्रिगेडिअर असल्याचे एक बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे.
दोन बाउन्सर्स एनएसजी कमांडो असल्याचा दावा
वर्माच्या बरोबर दोन सुरक्षा रक्षक होते. ते दोघे नॅशनल सेक्युरिटी गार्ड्स (एनएसजी) असल्याचा दावा वर्माने केला होता. भारत सरकारकडून आपल्याला संरक्षण पुरवण्यात आल्याचे तो सांगायचा, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे. ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’च्या डीनचे एक आयडी कार्डदेखील वर्माकडे आढळून आले. ते कार्ड बनावट असल्याचा संशय लष्करी अधिकाऱ्यांना आहे. तसेच त्याच्याकडून एक खोटे पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या बरेली येथील इंटेलिजन्स टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. तोतया ब्रिगेडिअर बनून आर्यन वर्मा का फिरायचा याचा शोध घेतला जात आहे. भारतीय सैन्याचे जवान सध्या आर्यन वर्माचा तपास करत आहेत, असे पोलीस अधीक्षक सौरभ दीक्षित म्हणाले. “लष्कराकडून वर्माची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाईल. त्यानंतर सविस्तर तपास केला जाईल”, असे दीक्षित म्हणाले.
२१ वर्षीय आर्यन वर्माकडे आढळलेला कागदपत्रांनुसार तो दिल्लीत नीट परीक्षेची तयारी करत होता. तो नीट परीक्षेत अनेकवेळा नापास झाला. वर्माचे वडील फलोत्पादन विभागात अधिकारी आहेत, तर त्याची आई शिक्षिका आहे.
