Fake IAS Officer Marriage Fraud and Human Trafficking Case: आपल्या मुलीच्या लग्नासाठी सरकारी अधिकारी मुलगा मिळावा, अशी अनेक पालकांची इच्छा असते. त्यात जर जावई आयएएस अधिकारी असेल तर सोन्याहून पिवळं. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एका मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी आयएएस अधिकारी असलेला मुलगा पाहिला आणि मोठ्या दिमाखात लग्नसोहळा पार पाडला. वरून १५ लाख रुपयांचा हुंडाही दिला. तर लग्नसमारंभावर १५ लाख खर्च केले. एकूण ३० लाख खर्च करून लग्न केले. पण लग्नानंतर पहिल्याच दिवशी मुलीबरोबर जे झाले, त्याने सर्वच हादरून गेले.
प्रकरण काय आहे?
गोरखपूर येथे राहणाऱ्या मुलीचे लग्न आयएएस अधिकाऱ्याबरोबर ठरले. माणिकपूर जिल्ह्यात आपली पोस्टिंग असल्याचे मुलाने सांगितले आणि मुलीच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. एवढेच नाही तर मुलाने कार्यालयातील त्याचे फोटोही दाखवले. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखत आणि काही राजकीय पुढाऱ्यांबरोबरचे फोटोही त्याने मुलीच्या कुटुंबीयांबरोबर शेअर केले.
आपल्या मुलीला आयएएस नवरा मिळतोय, या विचाराने वधूच्या कुटुंबीयांनी विश्वास ठेवला आणि पुढची चौकशी न करता लग्न ठरवून टाकले.
हुंड्याची मागणी
प्रीतम कुमार निषाद असे नाव असलेल्या मुलाने सुरुवातीला वचन दिले की, तो हुंडा घेणार नाही. मात्र लग्नाचा दिवस जवळ येताच त्याने १५ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली. लग्न रद्द होऊ नये, या भीतीने वधूच्या कुटुंबीयांनी त्याला १० लाख रुपये दिले. साखरपुड्याच्या दिवशी आणखी ५ लाख रुपये सुपूर्द केले.
११ मार्च २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. वधूच्या वडिलांनी सर्वांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली. वराच्या कुटुंबीयांची सरबराई केली.
अखेर बिंग फुटले आणि सर्वांना बसला धक्का
लग्नानंतर वधू सासरी गेली आणि तिला धक्काच बसला. माहेरहून सासरी जात असताना तोतया आयएएस अधिकारी मुलाने वधूचा विनयभंग केला. तसेच सासरी गेल्यानंतर तिला एका छोट्याशा खोलीत डांबण्यात आले. वधूने तात्काळ आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना तातडीने येण्यास सांगितले. वधूचे कुटुंबीय वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
वधूने आपल्या वडिलांना सांगितले की, तिचा पती आणि त्याचे कुटुंबीय तिला गोव्याला नेऊन विकण्याचा कट रचत होते. जर तिचे वडील वेळेत पोहोचले नसते तर त्यांची योजना यशस्वी झाली असती. वधूच्या वडिलांनी नंतर चौकशी केली असता त्यांना शेजाऱ्यांनी सांगितले की, प्रीतमचे यापूर्वी असेच दोन लग्ने झाली होती.
पोलिसांचा तपास सुरू
या घटनेनंतर वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे. या घटनेत मानवी तस्करीसारखा संभाव्य गुन्हा घडल्यामुळे यामागे मोठे रॅकेट असल्याचा त्यांना संशय आहे.
