Trupti Singh Fake IAS Bhopal Fraud News: स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षित तोतया महिला अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तृप्ती सिंह राजपूत (वय ३०) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या आवारात एक रील चित्रीत केल्याचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या रीलच्या आधारे तपास करत भोपाळ आणि अशोकनगर पोलिसांनी सापळा रचून तृप्ती आणि तिचा भाऊ सुधांशू सिंहा या दोघांना अटक केली.
नेमके प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्लॉग (व्हिडिओ) चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली एक तरुणी कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने बोलताना दिसत होती. “आम्ही मध्य प्रदेश विधानसभेत आलो आहोत. आत चित्रीकरणाला परवानगी नसल्याने आम्ही बाहेर हा व्हिडिओ बनवत आहोत,” असे सांगत ती कॅमेरा तिच्या इतर दोन मैत्रिणींकडे वळवते. त्यातील लाल साडी नेसलेली महिला हसत म्हणते, “आमच्या या खोड्या पाहून आम्ही दोघी ‘आयएएस’ अधिकारी आहोत यावर कोणाचा विश्वास बसेल का?”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. भोपाळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, हा व्हिडिओ विधानसभेचा नसून शहरातील एका मानवाधिकार संग्रहालयाच्या गॅलरीतील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित तरुणींची चौकशी केली असता, लाल साडीतील तृप्ती राजपूत हिनेच आपल्याला ‘आयएएस’ अधिकारी म्हणून वावरण्यास सांगितले असल्याचे त्यांनी उघड केले.
सरकारी नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा
पोलिसांच्या चौकशीत अनेक थक्क करणारे प्रसंग समोर आले आहेत. केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे हाच तृप्तीचा हेतू नव्हता, तर या तोतयागिरीच्या जोरावर तिने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश पर्यटन विभागात ‘अतिरिक्त संचालक’ पदावर कार्यरत असल्याचे भासवून तिने बेरोजगार तरुणांना सरकारी नोकऱ्यांचे, तर व्यावसायिकांना पर्यटन विभागाचे हॉटेल्स लीजवर देण्याचे आमिष दाखवले होते.

भोपाळचे पोलीस उपायुक्त विकास कुमार सहवाल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन महिलांचीही तृप्तीने फसवणूक केली होती. त्यांनाही स्वतःसारखे आयएएस अधिकारी बनवण्याचे प्रलोभन दाखवून तृप्तीने त्यांच्याकडून प्रत्येकी ३ लाख रुपये उकळले होते.
स्वतःच्या पतीलाही फसवले
धक्कादायक बाब म्हणजे तृप्तीने स्वतःच्या पतीलाही गंडवले होते. आपण आयएएस अधिकारी असल्याचा बनाव रचूनच पतीला लग्नासाठी तयार केले होते, असा दावा तिच्या पतीने केला असून सध्या त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत.
पोलिसांनी तृप्तीच्या भोपाळ येथील घरावर छापा टाकला असता, प्रशासकीय यंत्रणेलाही थक्क करणारे पुरावे हाती आले. तिच्या घरातून बनावट सरकारी ओळखपत्रे, शासकीय लेटरहेड्स, नियुक्तीपत्रे, ‘प्रशिक्षणार्थी आयएएस’ असा उल्लेख असलेली सन्मानचिन्हे आणि भारत सरकारचा फलक लावलेली एक टोयोटा इनोव्हा कार जप्त करण्यात आली.
अशोकनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक चंदेरी येथील एका शासकीय विश्रामगृहात (किला कोठी) तृप्तीने तिच्या साथीदारांसह मुक्काम केला होता. तिथे तिने चार स्थानिक तरुणांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ८० हजार रुपये आणि मूळ कागदपत्रे उकळली होती. नोकरी न मिळाल्याने तरुणांनी संशय घेऊन पोलिसांत धाव घेतली. यानंतर अशोकनगरच्या चंदेरी पोलिसांनी तक्रारदारांच्या मदतीनेच एक सापळा रचला आणि तृप्तीसह तिच्या भावाला चंदेरी येथे बोलावून बेड्या ठोकल्या.
याशिवाय, भोपाळमधील बागसेवनिया पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात ४९ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पर्यटन विभागाचे हॉटेल लीजवर मिळवून देण्याच्या बहाण्याने तिने एका व्यक्तीकडून ही रक्कम टप्प्याटप्प्याने उकळली होती.
