लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत व्होटचोरी झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा मांडत एक सविस्तर पोस्ट लिहिली होती. तसंच राहुल गांधी यांनी पुण्यातल्या छात्रो की गुंज या कार्यक्रमातही महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. या सगळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. खोटं बोल पण रेटून बोल हे राहुल गांधींचं धोरण आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सीजेपीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.
राहुल गांधींबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“जर कुणी महाराष्ट्रात येऊन खोटं बोलेल तर मी त्याला उत्तर देणारच. फॅक्ट्स आणि फिगर्सवर बोललं पाहिजे. पण रोज खोटं बोल आणि रेटून बोल हे त्यांचं धोरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय? की इतक्या वरच्या स्तरातल्या नेत्याला खोटं बोलण्याची लाजही वाटत नाही. खोटं उघडं पडलं तरीही खोटं बोलतात. अनेकदा असं होतं की हा खोटं बोलतोय आपल्याला माहीत असतं, लोकांना माहीत नसतं. रोज कुणी खोटं बोललं तर लोकांना वाटू लागतं हे खरं आहे. छात्रो की गुंज या कार्यक्रमात गेलेल्या एका मुलीने फॅक्ट चेक केला. तिने एका वेबसाईटवर हे पोस्ट केलं की राहुल गांधींनी जे ४० मुद्दे मांडले त्यातले २९ खोटे आहेत. आत्ताची नवी पिढी फॅक्ट चेक करते. पण अशा पद्धतीने फेक नरेटिव्ह असेल तर त्याला थेट नरेटिव्हने उत्तर मिळणारच.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या इन्फ्रा व्हिजन या विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याच कार्यक्रमात त्यांनी राहुल गांधींबाबत जो प्रश्न विचारला गेला त्याला उत्तर दिलं आहे.
सीजेपी बाबत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
तरुणांचा राग अंडरइस्टिमेट झाला असं नाही. पण कधीकधी एखादा विषय बॉयलिंग पॉईंटवर येतो. तशा पद्धतीने हा विषय आला होता. नीटचा पेपर फुटला हे मान्य पण हे आंदोलन होण्यापूर्वी पुन्हा परीक्षा होऊन निकालही आला. पण जे काही घडलं त्यात एक प्रकारे रणनीती आहे. कॉक्रोच जनता पार्टीला तुम्ही एकटं समजू नका. काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी जो प्रयोग केला की डाव्या विचारांचे आणि कडवे डावे यांना एकत्र करुन एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं. काँग्रेस विरोधकांची भूमिका करु शकत नाही कारण त्यांच्याकडे बॅगेज आहे. काँग्रेसची क्रेडिबिलिटी झीरो आहे. मग विरोधी स्पेस कशी तयार करायची? झीरो बॅगेजवाल्यांना एकत्र करायचं अशा पद्धतीच्या १८० संघटनांना भारत जोडो तयार केलं. त्याचा त्यांना काही प्रमाणात फायदा झाला. सीजेपी म्हणजे जे चार पाच तरुणांपुरतं मर्यादित नाही. त्यांच्या पुरतं मर्यादित होतं तेव्हा या आंदोलनाला फारसा प्रतिसाद नव्हता. आता या १८० संघटना पुन्हा एकदा यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. नव्याने पुन्हा एक नरेटिव्ह तयार करुन २०२४ चा प्रयोग करु इच्छितात. त्यामुळे फेसलेस व्यवस्था उभी करायची आहे ती ही व्यवस्था आहे. हा प्रयोग चालला आहे. त्याला आम्ही योग्य पद्धतीने उत्तर देऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
