पाच जणांना अटक

कोप्पल जिल्ह्यातील मियापूर खेड्यातील एका हनुमान मंदिरात दोन वर्षांच्या मुलाने प्रवेश केल्याने दलित कुटुंबास शुद्धीकरणासाठी २५ हजार रुपये दंड केल्याच्या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक टी. श्रीधरा यांनी सांगितले, की आम्ही या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून ही घटना ४ सप्टेंबरला झाली होती पण ती सोमवारी उघडकीस आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दलित कुटुंब तक्रार दाखल करण्यास इच्छुक नव्हते. चंद्रशेखर यांचे कुटुंब चेन्नादसार समाजाचे असून त्यांनी दोन वर्षांच्या मुलाला ४ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिरात नेले होते. हे कुटुंबीय मंदिराजवळ गेले पण दोन वर्षांच्या या मुलाने मंदिरात प्रवेश केला. त्याचा पुजाऱ्यांना राग आला. त्यामुळे उच्चवर्णीयांनी या कुटुंबीयांना ११ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन मंदिर शुद्धीकरणापोटी २५ हजार रुपयांचा दंड केला. उच्च वर्णीयातील काही ग्रामस्थांनी ही शिक्षा फारच कठोर असल्याचे मत व्यक्त केले होते. नंतर या घटनेची खेड्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली व ही बाब कुशटागी पोलिसांच्या निदर्शनास आली. उच्चवर्णीयांकडून सूड उगवला जाईल म्हणून हे कुटुंबीय तक्रार देण्यास तयार नव्हते.

चेन्नादसार समाजाच्या काही लोकांनी कोप्पल जिल्ह्यात भेट दिली होती. त्यामुळे वातावरण तणावाचे बनले. त्यानंतर समाज कल्याण खात्याचे सहायक संचालक बालचंद्र सनागल यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नंतरच्या दोन दिवसांत प्रशासनाने लोकांना जातिभेदाविरोधात सजग करण्यासाठी सभा घेतल्या, नंतर पोलिसांच्या उपस्थितीत चेन्नादसार समाजाच्या प्रतिनिधींसह उच्चवर्णीयांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली.