उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी प्रियकराबरोबर पळून गेली होती. त्यानंतर कुटुंबाने मुलीचा शोध घेऊन तिची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह भल्या पहाटे जाळण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ.

कासगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रविवारी पोलिसांना मिळाली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर पाणी टाकून पोलिसांनी आग विझवली. त्यानंतर मृतदेहाचे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबातील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींवर खून तसेच इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे तिच्याच गावातील एका १९ वर्षीय तरूणाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेजण मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मुलीच्या कुटुंबियांनी तिला प्रियकराशी असलेले संबंध तोडण्यास सांगितले होते. परंतु, मुलीने कुटुंबाचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. तिचा प्रियकर लुधियानात काम करायचा. तो काही दिवसांपूर्वी गावात आला होता. ९ जानेवारी रोजी मुलगी प्रियकराबरोबर आग्रा येथे पळून गेली होती. ते दोघे तिथे लग्न करणार असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी आग्रा येथे जाऊन दोघांना पकडले व गावी आणले. त्यानंतर गावाच्या बाहेर असलेल्या एका नातेवाईकाच्या घरात मुलगी व तिच्या प्रियकराला बांधून ठेवण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला व तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. त्यात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पहाटे जाळण्याचा बेत तिच्या कुटुंबियांनी आखला होता. या सगळ्या घडामोडी घडत असताना तिच्या प्रियकराला तिथून निसटता आले. त्याने घरी जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत त्याच्या कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.

कासगंजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशील कुमार गंगा प्रसाद म्हणाले, “अल्पवयीन मुलीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याची चौकशी केली सुरू आहे. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना पकडण्यासाठी तीन पोलिस पथक नेमण्यात आले आहेत.” दरम्यान, मुलीच्या पालकांच्या तसेच जवळच्या नातेवाईकांच्या घराला कुलूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मुलगी व तिच्या प्रियकराची कॉल रेकॉर्डिंग पोलीस तपासत आहेत. त्या दोघांमधील नाते नेमके कोणत्या स्वरूपाचे होते, तसेच घटना घडल्या ती वेळ काय होती, याचा पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.