उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे कथित सामूहिक बलात्कारानंतर मरण पावलेल्या १९ वर्षांच्या दलित तरुणीचे कुटुंबीय सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर हजर झाल्यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी २ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली.

न्या. पंकज मित्तल व न्या. राजन रॉय यांनी सोमवारी या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तसेच हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही न्यायालयापुढे साक्ष नोंदवली.

पीडित तरुणीच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी घेण्यात आला आणि याबाबत राज्य सरकार किंवा प्रशासनाकडून कुठलाही दबाव नव्हता, असे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी २ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली असल्याचे राज्य सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त महाधिवक्ता व्ही.के. शाही यांनी सांगितले. यापूर्वी मुलीचे आईवडील आणि तीन भाऊ यांना हाथरस येथून कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाचा सद्य:स्थिती अहवाल सादर करण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना पाचारण केले होते.

चार उच्चवर्णीय इसमांनी १४ सप्टेंबरला या तरुणीवर कथितरीत्या बलात्कार केला होता. गंभीर जखमी झालेली ही तरुणी १५ दिवसांनी दिल्लीच्या एका रुग्णालयात मरण पावली. त्यानंतर तिच्या पार्थिवावर रात्रीच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले.