३५ वर्षीय निवासी डॉक्टरचा मृतदेह दिल्लीतल्या सिव्हिल लाइन्स भागात असलेल्या अरुणा असफ अली रुग्णालयातल्या एका खोलीत सापडला. दिल्ली पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहचलो. त्यानंतर हे समजलं की डॉ. सिमरप्रीत सिंग आनंद हे भूल तज्ज्ञ विभागात काम करत होते. फोन आला तेव्हा डॉक्टर आनंद हे बेशुद्ध आहेत असं आणि रुम नंबर १०९ मध्ये आहेत असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले, डॉक्टरांनी आनंद यांना तपासलं ज्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांना रुम नंबर १०९ मध्ये डॉ. आनंद यांची तीन पानी सुसाईड नोट आढळून आली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?
डॉ. आनंद हे मूळचे पंजाबच्या लुधियानामधले होते. दिल्लीतल्या अरुणा असफ अली रुग्णालयात ते भूल तज्ज्ञ विभागात मागच्या तीन वर्षांपासून काम करत होते. ५ जुलैच्या दिवशी त्यांची नाईट शिफ्ट होती. ते रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत रुग्णालयात आले होते. त्यानंतर त्यांची ड्युटी रुम ही आतून बंद होती. हे दार सकाळी ९ च्या दरम्यान ठोठावून नंतर सगळ्यांनी मिळून उघडलं. पण डॉक्टर आनंद तोपर्यंत बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना या ठिकाणी तीन पानांची सुसाईड नोट आढळून आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
सुसाईड नोटबाबत पोलिसांनी काय सांगितलं?
सुसाईड नोटबाबत पोलिसांनी जी माहिती दिली त्यात पोलिसांनी हे सांगितलं आहे की मध्य प्रदेशातील एका महिला डॉक्टरसह डॉक्टर आनंद यांचे प्रेमसंबंध होते. मात्र दोन्ही कुटुंबांनी या दोघांच्या लग्नाला विरोध दर्शवला होता. तुम्ही दोघंही डॉक्टर असलात तरीही आपली आणि त्यांची जात वेगळी आहे त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही असं दोन्हीकडच्या घरातल्यांचं म्हणणं होतं. त्याचमुळे आलेल्या तणावाला कंटाळून डॉक्टर आनंद यांनी आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. डॉ. आनंद यांची सुसाईड नोट ही तीन पानांची आहे आणि त्यांनी त्यांच्या डायरीत लिहिली आहे. ही डायरीही आम्ही ताब्यात घेतली आहे असंही पोलिसांनी सांगितलं.
