हरियाणातील वल्लभगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीने बहीण-भावाच्या नात्याचा खून केला आहे. क्षुल्लक कारणावरून या मुलीने तिच्या धाकट्या भावाची गळा दाबून हत्या केली आहे. आई-वडील माझ्यापेक्षा त्याच्यावर अधिक प्रेम करतात, असं या मुलीने पोलिसांना सांगितलं. त्याच रागातून तिने आपल्या भावाची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत सांगितलं. या अल्पवयीन मुलीला आज (गुरुवार, १ जून) जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर सादर केलं जाईल.
या मुलीचे आई-वडील मंगळवारी संध्याकाळी कामावरून घरी परतले. घराचा दरवाजा उघडताच त्यांना मोठा धक्का बसला, कारण त्यांचा लहान मुलगा जमिनीवर निपचित पडला होता. त्यांनी लगेच मुलाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयत्नांनंतरही मुलगा शुद्धीवर येत नाहीये हे पाहून ते घाबरले. मुलगा मृतावस्थेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आई-वडील घरात आले तेव्हा घरात मुलाच्या मृतदेहासह मुलगी एकटीच होती असं आईने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला.
पोलीस चौकशीदरम्यान समजलं की, अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते दोघे आई-वडिलांकडे वल्लभगड येथे आले होते. या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलाला मोबाईल फोन दिला होता. मंगळवारी मुलगा त्या फोनवर गेम खेळण्यात मग्न असताना बहिणीने काही वेळ मलाही दे फोन अशी विनंती भावाकडे केली. परंतु भावाने फोन देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तिने भवाचा गळा आवळून खून केला. पोलीस चौकशीत मुलीने सांगितलं की, तिचे आई-वडील तिच्यापेक्षा तिच्या भावावर जास्त प्रेम करतात.
हे ही वाचा >> “शिंदेंची सत्ता आहे, ते मुख्यमंत्री असेपर्यंतच…”, जयंत पाटलांचा मिश्किल टोला; म्हणाले, “आमच्या एका कार्यकर्त्यानेही…”
फरीदाबाद पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी सुबे सिंह या प्रकरणाची माहिती देताना म्हणाले, “मुलीला असं वाटतं की, तिचे आई-वडील तिच्यापेक्षा तिच्या भावावर जास्त प्रेम करतात. मुलांच्या आई-वडिलांनी मुलाला एक मोबाइल फोन दिला होता, या फोनवर तो गेम खेळत होता. मुलीने आपल्या भावाकडे फोन मागितला, पण भावाने फोन देण्यास नकार दिला. परिणामी बहीण संतापली आणि तिने आपल्या भावाची हत्या केली.