Faridabad News : हरियाणामधील फरीदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. फरीदाबादमधील रेल्वेच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. पण पुलाखाली साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एका बँकेच्या मॅनेजरने आपली कार पाण्यात घातली. मात्र, त्यानंतर कार पाण्यात बुडाली आणि बँकेच्या मॅनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

नेमकी काय घडलं?

फरीदाबादमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. आता ऑफिस सुटल्यानंतर बँकेच्या मॅनेजरसह कॅशियर असे दोघेजण एका चारचाकी गाडीमधून घरी जात असताना मध्येच फरीदाबाद येथील एका रेल्वेच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बँकेच्या मॅनेजरने आपली गाडी पाण्यामध्ये घातली आणि गाडी पाण्यामधून पलिकडे जाईल असं वाटलं. मात्र, पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे गाडी पाण्यामध्ये गेल्यानंतर बुडाली. त्यामुळे गाडीमध्ये बँकेचा मॅनेजर आणि त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा सहकारी हे दोघेही गाडीमध्ये अडकले आणि काही वेळाने या दोघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Chhattisgarh : जादूटोण्याचा संशय, तीन महिलांसह पाच जणांची बेदम मारहाण करून हत्या; छत्तीसगडमध्ये एकाच आठवड्यात दुसरी घटना

हरियाणा पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी मुसळधार पावसात जुन्या फरिदाबाद रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे ही दुर्घटना घडली. पुण्यश्रय शर्मा आणि विराज द्विवेदी गुरुग्रावरून ग्रेटर फरीदाबाद येथील त्यांच्या घरी जात होते. मात्र, घरी जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, फरिदाबादमधील जुन्या रेल्वे पुलाखाली मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने त्या ठिकाणाहून नागरिकांनी गाड्या न नेण्याचा किंवा त्या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहनही केले होते. मात्र, त्या ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी किती आहे? याचा अंदाज न आल्यामुळे दोघांनी आपली कार पाण्यात घातली. त्यामुळे त्या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, या घटनेनंतर ज्यावेळी एसयूव्ही गाडी पाण्यात बुडू लागली होती. त्यावेळी या दोघांनीही कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना गाडीमधून बाहेर पडण्यात अडथळा आला आणि ते बुडाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर शनिवारी पहाटे ४ वाजता विराज द्विवेदी आणि पुण्यश्रय शर्मा यांचा मृतदेह वाहनातून बाहेर काढण्यात आला.