फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खासगी शाळेत बुधवारी एका मास्क घातलेल्या व्यक्तीने प्रवेश करत एका शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात २९ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाला. ३० सेकंदात तब्बल ३० वार करून आरोपीने या शिक्षिकेला संपवलं. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण फरिदाबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
फरिदाबाद शिक्षिका हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतील आरोपी हा या शिक्षिकेचा तब्बल दोन वर्ष पाठलाग करत होता आणि त्याने एकदा अपहरण करण्याचा प्रयत्नही केला होता, अशी धक्कादायक माहिती शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी काय आरोप केले?
आरोपीने वर्षाच्या सुरुवातीला कथितरीत्या तिचं घरातून अपहरण केलं होतं. तसेच तिच्या पतीला मारहाण केली होती. त्याने तिच्यापासून दूर राहण्याचं त्याच्या कुटुंबीयांनी आश्वासन देऊनही त्याने तिचा पाठलाग करणं सोडलं नव्हतं. जर पाठलाग सुरूच ठेवला तर पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी दिला होता. मात्र, त्यानंतर आरोपीने तिची क्रूर हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.
दरम्यान, आरोपी अमित (२१) हा गावात दूध विकण्याचं काम करतो, त्याची या शिक्षिकेशी २०२४ मध्ये ओळख झाली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अमित हा तिच्या प्रेमात वेडा झाला होता. जेव्हा ही शिक्षिका कोट या गावात शिकवत होती, तेव्हा अमितच्या संपर्कात ती आली. त्यानंतर तिने ती नोकरी सोडल्यानंतरही तो तिचा पाठलाग करत राहिल्याचा आरोप शिक्षिकेच्या पतीने केला आहे.
त्यानंतर जानेवारीत तो कथितरीत्या फिरोजपूर येथे या शिक्षिकेच्या घरी गेला आणि तिला बळजबरीने कोट या गावी घेऊन गेला. आरोपीला या शिक्षिकेशी लग्न करायचं होतं. मात्र, त्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांच्या मध्यस्थीने त्या शिक्षिकेला पुन्हा तिला पतीच्या घरी पाठवण्यात आलं. या संपूर्ण घटनेत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, अपहरण आणि मारहाणीच्या आरोपांची ते पडताळणी करत आहेत. पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, जर शिक्षिकेने आरोपीच्या त्रासाबाबत आक्षेप घेतला होता. तरीही जर त्याने तिला त्रास देणं सुरूच ठेवलं होतं, तर ती पोलिसांत तक्रार करेल, अशी चेतावणी तिने त्याला दिली होती. कुटुंबाने नमूद केलेल्या आधीच्या घटनांची आम्ही पडताळणी करत आहोत.
शिक्षिकेवर ३० सेकंदात ३० वार
फरिदाबाद शिक्षिका हत्या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी एक तरुण शाळेच्या गेटवर आला आणि त्याने शिक्षिकेशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा शिक्षिका त्याला भेटण्यासाठी गेटपाशी आल्या, तेव्हा त्या व्यक्तीने चाकूने त्यांच्यावर ३० सेकंदात ३० हून अधिक वार केले. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, मास्क घातलेला हा व्यक्ती शाळेत प्रवेश करतो आणि लॉबीमध्ये वाट पाहत थांबतो. शिक्षिका दिसताच तो तिला बाहेर येण्याचा इशारा करतो. ती जवळ येताच तो तिचा गळा पकडतो, तिला ओढत बाहेर नेतो आणि तिच्यावर चाकूने वार करू लागतो. महिला जमिनीवर पडल्यानंतरही तो तिच्यावर वार करत राहिला. या घटनेत तिचा मृत्यू झाला.
