Faridabad teacher stabbed on camera : फरिदाबादमधील एका खाजगी शाळेत बुधवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. एका मास्क घातलेल्या व्यक्तीने शाळेच्या गेटमधून आत प्रवेश केला, एका शिक्षिकेचे नाव विचारले आणि ती भेटायला बाहेर येताच तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलीस चौकीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या सिक्रोना गावातील एका खाजगी शाळेत कार्यरत असलेल्या २९ वर्षीय संध्या या शिक्षिकेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
शाळा प्रशासकाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी एक तरुण शाळेच्या गेटवर आला आणि त्याने संध्या यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा संध्या त्याला भेटण्यासाठी गेटपाशी आल्या, तेव्हा त्या व्यक्तीने चाकूने त्यांच्या चेहरा, मान आणि छातीवर अवघ्या ३० सेकंदात ३० हून अधिक वार केले. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, मास्क घातलेला हा माणूस शाळेत प्रवेश करतो आणि लॉबीमध्ये वाट पाहत थांबतो. शिक्षिका दिसताच तो तिला बाहेर येण्याचा इशारा करतो. ती जवळ येताच तो तिचा गळा पकडतो, तिला ओढत बाहेर नेतो आणि तिच्यावर चाकूने वार करू लागतो. महिला जमिनीवर पडल्यानंतरही तो तिच्यावर वार करत राहिला. किंचाळण्याचा आवाज ऐकून धावून आलेले शाळा प्रशासक जेव्हा मध्यस्थी करायला गेले, तेव्हा हल्लेखोराने त्यांच्यावरही चाकू उगारला. त्यानंतर तो पुन्हा जमिनीवर पडलेल्या महिलेकडे गेला आणि तिच्या पोटावर व चेहऱ्यावर आणखी २० वेळा वार केले. यानंतर तो नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेला.
एनडीटीव्हीशी बोलताना शाळा प्रशासकाने सांगितलं की, “सकाळी साडेनऊच्या सुमारास मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना बाहेर कॉरिडोअरमधून ओरडण्याचा आवाज आला. मी बाहेर येऊन पाहिलं तर ती जमिनीवर पडली होती आणि एक माणूस तिच्यावर वारंवार चाकूने वार करत होता.” जेव्हा प्रशासकाने हल्लेखोराला थांबवण्यास सांगितलं, तेव्हा तो चाकू हातात घेऊन त्यांच्या अंगावर धावून आला. प्रशासक स्वतःच्या रक्षणासाठी काही शोधायला लागेपर्यंत हल्लेखोर तिथून पसार झाला होता. हल्ल्यानंतर संध्या यांना तात्काळ अल फलाह रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पीडितेने आरोपीविरुद्ध दाखल केली होती छेडछाडीची तक्रार
कोट गावातील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय अमित नावाच्या आरोपीला घटनेच्या दोन तासांच्या आत पोलिसांनी अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, सुमारे दोन वर्षांपूर्वी अमितची संध्याशी ओळख झाली होती आणि त्याने अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. संध्याची त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नसतानाही अमित तिचा वारंवार पाठलाग करत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून संध्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. काही दिवसांपूर्वी तिने अमितविरुद्ध छेडछाडीची तक्रारही नोंदवली होती, परंतु त्यावेळी त्याने जाहीर माफी मागितली होती. जुन्या वादाचा आणि त्या तक्रारीचा बदला घेण्यासाठीच अमितने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
