शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत सध्या उत्तर प्रदेशमध्ये चांगलेच सक्रीय झालेले दिसत आहे. आता त्यांनी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारचा घंटा वाजणार असल्याचं विधान केलंय. तसेच हे वादळ आता पूर्वांचलकडे जाणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय. मागील 10 महिन्यांपासून शेतकरी देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. ते बडनगरमध्ये बोलत होते.

राकेश टिकैत यांना पत्रकारांनी बडनगरला पुन्हा कधी येणार असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, “जेव्हा केव्हा इकडं कार्यक्रम ठरेल तेव्हा पुन्हा येईल. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. यावरुन जाण्याचा सर्वांना अधिकार आहे.”

“सरकार 10 महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी ऐकत नाहीये”

बडनगरमधील घंट्याविषयी बोलताना ते म्हणाले की हा घंटा खराब झाला तर तो दुरुस्ती करण्याची जबाबदारी संघटनेची असेल. खराब झाल्यानंतर दुसरा घंटा लावत राहू. जोपर्यंत घंटा राहिल तोपर्यंत संघटना राहिल, टिकैत नाव राहिल. सरकार 10 महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी ऐकत नाहीये. किमान घंट्याच्या निमित्ताने तरी ऐकेल अशी आशा आहे. ते हिंदुत्वाच्या नावावर निवडणुकीत तिकीट देणार आहेत. आम्ही घंटा वाजवला, शंखही वाजवला, आता या सरकारचा घंटा वाजणार आहे. हे वादळ आता इथून पूर्वांचलच्या दिशेने जाईल.”

“आंदोलनाचं ठिकाण सोडणार नाही, आमची समाधी तयार झाली तरी चालेल”

राकेश टिकैत यांनी नुकतीच उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये कृषी कायद्यांविरोधात किसान महापंचायत घेतली होती. या सभेला हजारो शेतकरी हजर होते. यावेळी टिकैत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. आम्ही जेथे आंदोलन करत आहोत तेथून हलणार नाही. यासाठी आमची तिथं समाधी बनली तरी चालेल, असाही इशारा टिकैत यांनी सरकारला दिला होता.

“उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 140 पेक्षा जास्त जागा मिळवता येणार नाही”

राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी राजकीय भाकित केलंय. यानुसार भाजपला आगामी निवडणुकीत 140 पेक्षा जास्त जागा मिळू शकणार नाही, असा दावा राकेश टिकैत यांनी केलाय. यावेळी विरोधकांकडून त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या नावाखाली राजकारण करत असल्याच्या आरोपावर प्रश्न करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “या देशात मतदान करणारा प्रत्येक व्यक्ती राजकारण करत असतो. यानुसार मी देखील राजकारण करत आहे असं मानायला हरकत नाही.”