किसान एकता मंचचं पेज फेसबुककडून ‘ब्लॉक’… संतापानंतर पुन्हा केलं ‘अनब्लॉक’

पेज बंद करण्याचा कारणाचा फेसबुककडून खुलासा

कडाक्याच्या थंडीनं गारठलेल्या दिल्लीत शेतकरी आंदोलनामुळे वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, संयुक्त किसान मोर्चाने तयार केलेल्या किसान एकता मंच फेसबुक पेजवरून रविवारी रात्री बराच गोंधळ झाला. फेसबुकनं हे पेज ब्लॉक केलं. त्यानंतर फेसबुकविरोधात संताप वाढल्यानंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आलं.

दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची माहिती देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने फेसबुकवर किसान एकता मंच नावाचं पेज तयार करण्यात आलं आहे. हे पेज रविवारी अचानक फेसबुककडून बंद करण्यात आलं होतं. योगेंद्र यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे. फेसबुक लाईव्ह करत असताना मध्येच पेज अनपब्लिश्ड झाल्याचा संदेश मिळाला. शेतकऱ्यांविषयी असं काही तरी आहे, ज्यामुळे हे सरकार घाबरले आहे आणि सरकार असं काहीतरी आहे ज्यामुळे फेसबुकला भीती वाटली आहे, असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.

फेसबुकनं किसान एकता मंचचं इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद केलं असल्याचा दावा यादव यांनी केला. फेसबुकनं केलेल्या कारवाईवरून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या. त्यानंतर फेसबुककडून पुन्हा किसान एकता मंचचं फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आलं.

आणखी वाचा- आंदोलन! पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ दरम्यान वेळी शेतकरी वाजवणार थाळ्या

कारवाईवर फेसबुक काय म्हणाले?

किसान एकता मंचचं फेसबुक पेज ब्लॉक केल्यानंतर तीन तासांनी पुन्हा अनब्लॉक करण्यात आलं. फेसबुककडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावर नंतर फेसबुकनं खुलासाही केला आहे. किसान एकता मंचच्या पेजकडून कंपनीच्या कम्युनिटी नियमांचं पालन केलं जात नव्हतं म्हणून पेज बंद करण्यात आलं होतं, असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Farmer protest update facebook blocked farmers protest kisan ekta manch fb page instagram pages restored after few hours bmh

ताज्या बातम्या