वादग्रस्त कृषी कायदे पंतप्रधान मोदी यांनी मागे घेतल्याचे जाहीर केल्यावर आणि हे कायदे संसदेत रद्द करण्याचे सोपस्कार पार पडल्यावर दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन संपल्याचे शेतकरी संघटनेर्फे गुरुवारी जाहीर केले होते. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तीन सीमेवर शेतकरी १५ महिने ठाम मांडून आंदोलन करत होते. आता या सर्व जागा रिकाम्या करायला सुरुवात झाली आहे.

संघटनेने केलेल्या आवाहनानुसार आज सकाळपासून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सर्व ठिकाणांवरुन माघारीची तयारी शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. इतक दिवस आंदोलन सुरु असतांना उभारण्यात आलेले भक्कम असे तंबू, कमानी, मंडप हे सर्व काढण्यास सुरुवात झाली आहे. याचबरोबर मुक्काम करण्याच्या हेतूने सोबत आणलेले साहित्य, आवश्यक सामान, पशूधन हे गाड्यांमधे भरून परतीचा मार्गाला शेतकरी लागले आहेत, शेतकरी घरी निघाले आहेत.

” ही सर्व माघारीची प्रक्रिया पूर्ण व्हायला चार ते पाच दिवस लागतील, मी स्वतः १५ डिसेंबरला आंदोलनाची जागा सोडेने”,असं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. या आंदोलनात ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केले त्यांचे आभार मानण्याचे आज सकाळी झालेल्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे टिकैत यांनी सांगितले.

मोठ्या संख्येने आंदोलन करणार शेतकरी हे आता त्यांच्या राज्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणामधे परत निघाले. निघताना आंदोलन यशस्वी झाल्याबद्द्ल, संघर्षात विजय मिळाल्याबद्दल घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आंदोलनाची जागा सोडली. इतके दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता शेतकरी ठाण मांडून होते, तेव्हा आता आंदोलनाची हा जागा सोडतांना घरी निघतांना शेतकरी भावूक झाल्याचं बघायला मिळालं.

दरम्यान १५ जानेवारील एक आढावा बैठक घेतली जाणार असून केंद्र सरकारने मान्य केलेल इतर मुद्दे हे अंमलात आणले जात आहेत की नाही याचा आढावा घेतला जाणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.