हवामान बदलामुळे भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त

बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला

(प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या तीस वर्षांत भारतात ५९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यामागे हवामान बदल हे मुख्य कारण होते, असे संशोधनात दिसून आले आहे. जागतिक तापमान वाढत जाईल त्याप्रमाणात आत्महत्यांचे प्रमाण भारतात वाढेल, असा इशाराही देण्यात आला.

बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला असून त्यात हवामान बदलामुळे फसलेले पीक हंगाम हे शेतक ऱ्यांच्या दारिद्रय़ व आत्महत्यांचे खरे कारण आहे असे त्यांनी म्हटले आहे. कृषी हंगामात दिवसाचे तापमान २० अंशावर असेल व त्या तापमानात एक अंश सेल्सियस वाढ झाली तरी देशात ६५ आत्महत्या घडतात. जर तापमान पाच अंशांनी वाढले तर त्याचा परिणाम पाच पट होतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या तम्मा कार्लटन यांनी सांगितले, की हजारो लोक अशा विपन्नावस्थेत ढकलले जातात हे धक्कादायक व मन पिळवटून टाकणारे आहे. यात जर आपण धोरणांमध्ये बदल केले तर अनेक लोकांना वाचवता येईल. उच्च तापमान व कमी पाऊस जर कृषी हंगामात असेल तर त्याचा वार्षिक आत्महत्या दरावर मोठा परिणाम होतो. जर कृषी हंगाम सुरू नसताना तापमान वाढले व पाऊस कमी झाला तर आत्महत्या दरावर काही परिणाम होत नाही कारण त्या वेळी पिके शेतात नसतात. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

भारतात शेतकरी आत्महत्या मोठय़ा प्रमाणात होत आहेत, १९८० पासून देशातील एकूण आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले असून दरवर्षी १ लाख ३० हजार लोक आत्महत्या करीत आहेत. यातील ७ टक्के वाढ ही जागतिक तापमानवाढीशी संबंधित असून जागतिक तापमान वाढ ही मानवी कृत्यांशी निगडित आहे. जगातील ७५ टक्के शेतकरी आत्महत्या या विकसनशील देशात होतात त्यातील एक पंचमांश शेतकरी आत्महत्या भारतात होतात. पण गरीब लोक अशा धोक्यांना बळी का जातात याचे कारण अजून देता आलेले नाही, असे सांगून या संशोधनात म्हटले आहे, की २०५० पर्यंत तापमानात तीन अंश सेल्सियस वाढ होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भारतीय समाजावर होताना दिसत आहे, तेथे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. जेव्हा कृषी हंगाम काळात तापमान वाढते तेव्हा आत्महत्या जास्त होतात. यावर उपायांबाबत मतभिन्नता आहे. त्यात शेतकऱ्यांची आर्थिक जोखीम कमी करणे हा एकच मार्ग आहे. भारत सरकारने त्यासाठी १.३ अब्ज डॉलर्सची पीक विमा योजना राबवली आहे. त्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याचा हेतू आहे पण तो उपाय पुरेसा आहे की नाही हे सांगता येणार नाही. भारतात निम्मे लोक मोसमी पावसावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायात रोजीरोटी कमावतात, पण शेती ही हवामानामुळे संवेदनशील बनते.  मोसमी पाऊस कधी जास्त कधी कमी, कधी उष्णतेच्या झळा व दुष्काळ अशी परिस्थिती असते. भारतातील एक तृतीयांश लोक हे आंतरराष्ट्रीय दारिद्रय़ निकषापेक्षा कमी पैसे कमावतात.

संशोधनातील घटक

कार्लटन यांनी त्यांच्या संशोधनात  हवामान बदल, पीक उत्पादन व आत्महत्या यांच्या आकडय़ांचा मेळ घातला. १९६७ ते २०१३ या काळातील ३२ राज्यांतील आकडेवारी यात वापरली. आत्महत्यांची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माहितीवर आधारित होती. जून ते सप्टेंबर दरम्यानचा पाऊस यात विचारात घेण्यात आला. मोसमी पावसाचे आगमन व निर्गमन तसेच पीक उत्पादन ही सगळी आकडेवारी गोळा करून त्याची संगती लावत हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Farmer suicides rise in india as climate change