scorecardresearch

२०५ किलो कांदा विकण्यासाठी शेतकऱ्याचा तब्बल ४१५ किमी प्रवास, मिळाले फक्त ८ रुपये!

उत्तर कर्नाटकमधील एका शेतकऱ्याने तब्बल २०५ किलो कांदे विकल्यानंतर त्याला शेवटी फक्त ८ रुपये शिल्लक राहिले आहेत.

२०५ किलो कांदा विकण्यासाठी शेतकऱ्याचा तब्बल ४१५ किमी प्रवास, मिळाले फक्त ८ रुपये!
सांकेतिक फोटो

जगाचा पोशिंदा असला तरी शेतकऱ्याची नेहमीच आबाळ होत आलेली आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आदी संकटांना शेतकऱ्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. मात्र शेतमालाला भाव न मिळणे ही भारतभरातील शेतकऱ्यांची मुख्य समस्या आहे. याचेच एक उदाहरण कर्नाटकमधून समोर आले आहे. उत्तर कर्नाटकमधील एका शेतकऱ्याने तब्बल २०५ किलो कांदे विकल्यानंतर त्याला शेवटी फक्त ८ रुपये शिल्लक राहिले आहेत. शेतकऱ्याशी घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कर्नाटकमधील गडाग या भागातील पवडेप्पा हालिकेरी नावाच्या शेतकऱ्यासोबत हा प्रकार घडला. त्याने बंगळुरू येथील यशवंतपूर येथील बाजारात २०५ किलो कांद्याची विक्री करण्यासाठी तब्बल ४१५ किमीचा प्रावास केला. मात्र येथे त्याला निराशेला सामोरे जावे लागले. आपला दोन क्विंटल कांदा विकून या शेतकऱ्याच्या हातात शेवटी फक्त ८.३६ रुपये शिल्लक राहिले आहेत. या सर्व व्यवहाराची पावती सध्या समाजमाध्यांवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा >>> शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार! ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडीचा होकार

‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार या शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये भाव मिळाला. त्यात मालवाहतुकीचे ३७७ रुपये कापण्यात आले. त्यानंतर हमालीचे २४ रुपये कापण्यात आले. शेवटी शेतकऱ्याच्या हातात फक्त ८.३६ रुपये शिल्लक राहिले. या शेतकऱ्याने इंटरनेटवर आपली व्यथा मांडली आहे. त्याने यापुढे आपला शेतमाल विकण्यासाठी बंगळुरू येथे येऊ नका, असे आवाहान अन्य शेतकऱ्यांना केले आहे.

हेही वाचा >>> “काश्मीर फाईल्स व्हल्गर आणि प्रचारकी”, ज्युरींच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रया, म्हणाले “चित्रपटात एका पक्षाचा…”

दरम्यान, या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी उत्तर कर्नाटकमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. याच कारणामुळे येथील शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी केली जात आहेत. अतिवृष्टीमुळे या भागातील कांदापिकाला मोठा फटका बसला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 08:09 IST

संबंधित बातम्या