आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केल्यास फोडून काढू; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा

हरियाणा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील शेतकरीही महापंचायतील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता टिकैत यांनी वर्तवली आहे.

bjp-can-kill-senior-hindu-leader-to-win-up-says-rakesh-tikait-gst-97
शेतकरी नेते राकेश टिकैत (Photo : PTI)

केंद्राच्या तीन शेती कायद्यांना विरोध करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने रविवारी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, असा विश्वास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलाय. “महापंचायतीसाठी किती लोक येतील, हे सांगणं शक्य नाही. मात्र, मोठ्या संख्येनं लोक पोहोचतील एवढं नक्की. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणीही जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू,” असे राकेश टिकैत यांनी म्हटलंय.

पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे. ते अमृतसरहून पहाटे ४ वाजता, जालंधरमधून सकाळी ५ वाजता आणि लुधियानाहून सकाळी ६ वाजता एक्स्प्रेस ट्रेन पकडतील.

दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून ४००ते५०० शेतकरी महापंचायतीकडे रवाना होतील. टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून शेतकरी बसने मुझफ्फरपूरसाठी निघत आहेत. शुक्रवारी रात्री दोन बस मुझफ्फरनगरसाठी रवाना झाल्या, आज शनिवारी सकाळी आणखी दोन बस गेल्या असून इतर बस रात्री शेतकऱ्यांना घेऊन निघतील. महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, असंही राकेश टिकैत यांनी सांगितलं. तसेच हरियाणा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील शेतकरीही महापंचायतील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता टिकैत यांनी वर्तवली. शेतकऱ्यांना मुजफ्फरनगरला नेण्यासाठी ५०० बसेस भाड्याने घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळतीए.

“ही महापंचायत केवळ निवडणुकीशी जोडलेली नाहीए. युपीमध्ये सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. तिथले शेतकरी अडचणीत आहेत. यूपीमध्ये विजेचे दरही सर्वाधिक आहेत. २०१६ पासून उसाच्या दरात वाढ झालेली नाही. केवळ पाच रुपये, पाच पैसे प्रति किलोने दरात वाढ करून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करताय का? ” असा सवालही राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला केलाय.

“महापंचायत सुरळीतरित्या पार पडावी, याची जबाबदारी ५ हजार स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास सर्व स्वयंसेवकांन आपत्कालीन क्रमांक देण्यात आला आहे. महापंचायतीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंचायतीच्या मुख्य व्यासपीठापर्यंत कोण-कोण पोहोचू शकतंय, हे पहावं लागेल. तसेच गर्दीमुळे जे पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे,” अशी माहिती टिकैत यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Farmers mahapanchayat in muzaffarnagar will break and reach if they stop us says rakesh tikait hrc

ताज्या बातम्या