मोदी आंदोलक शेतकऱ्यांना म्हणाले घरी परता, शेतकरी नेते टिकैत म्हणतात, “आंदोलन लगेच मागे घेणार नाही, आम्ही वाट बघू जोपर्यंत…”

पंतप्रधान मोदींनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा करत आंदोलकांनी घरी परतण्याचं आवाहन केलं

farmers law
पंतप्रधान मोदींनी केली कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. गुरुनानक जयंतीनिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची प्रतक्रिया पूर्ण केली जाईल अशा शब्द देत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना घरी परतण्याचं आवाहन केलं आहे. मात्र शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आंदोलक शेतकरी लगेच घरी परतणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर टिकैत यांनी ट्विटरवरुन पहिली प्रतिक्रिया दिलीय.

टिकैत यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया देताना आंदोलन लगेच मागे घेतलं जाणार नाही असं म्हटलं आहे. “आंदोलन लगेच मागे घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसापर्यंत वाट बघू जोपर्यंत कृषी कायदे संसदेमध्ये रद्द केले जातील. सरकार एमएसपीबरोबरच शेतकऱ्यांच्या दुसऱ्या मुद्द्यांवर पण चर्चा केली पाहिजे, (नाहीतर तोपर्यंत आम्ही वाट पाहू)”, असं टिकैत म्हणाले आहेत.

मोदी नक्की काय म्हणाले?
आमचं सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खास करुन छोट्या शेतकऱ्यांच्या हितासाठी देशाच्या भल्यासाठी शेतकऱ्यांप्रती पूर्ण समर्पण भावाने चांगल्या इच्छेने काम करत आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. “कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा एक गटच विरोध करत होता. मात्र ते आमच्यासाठी महत्वाचं होतं. कृषी अर्थशास्त्रांनी, वैज्ञानिकांनी आणि जाणकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला.आम्ही विनम्रपणे आणि मोकळ्या मनाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो. अनेक माध्यमांमधून व्यक्तीगत आणि बैठकांच्या माध्यमातून चर्चा सुरु होती. आम्ही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांना समजून घेण्याचे सर्व प्रयत्न केले. सरकार हे कायदे बदलण्यासही तयार झाली, दोन वर्षे ते लागू न करण्याचाही प्रस्ताव दिला. हा विषय नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. हे सर्व देशासमोर आहे,” असं मोदी म्हणाले.

माफी मागतो आणि…
“मी आज देशवासियांची माफी मागत, सच्चा मनाने, पवित्र हृदयाने सांगू इच्छितो की कदाचित आमच्या तपस्येमध्येच काही कमतरता असेल ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखं सत्य आम्ही काही शेतकरी बंधूंना समजू शकलो नाही. आज गुरुनानक देवजींचं पवित्र प्रकाश पर्व आहे. हा काळ कोणालाच दोष देण्याचा नाहीय. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. या महिन्याच्या शेवटी सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेनशाच्या सत्रामध्ये कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करणार आहोत,” असं मोदींनी सांगितलं.

शेतकऱ्यांना केलं आवाहन
“मी आज सर्व आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की आज गुरु पर्वाचा पवित्र दिवस आहे. आता तुम्ही तुमच्या तुमच्या घरी परत जा. तुम्ही तुमच्या शेतांमध्ये परत जा, कुटुंबियांकडे परत जा. चला एक नवी सुरुवात करुयात,” असं आवाहन मोदींनी केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Farmers protest centre government to repeal all three farm laws pm modi says rakesh tikait says we will not go back scsg

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या