केंद्र सरकानं पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांवरून शेतकऱ्यांनी गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून तीव्र आंदोलन छेडलं आहे. दिल्लीच्या सीमारेषेवर मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलन करत असताना राजस्थानमध्ये देखील तशाच प्रकारचा विरोध शेतकरी करत आहेत. आज दुपारी राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं केंद्रीय कायद्यांचा विरोध करत होते. त्यासाठी घोषणाबाजी देखील केली जात होती. मात्र, नेमके त्याच वेळी तिथे भाजपा नेते आणि एससी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलाश मेघवाल आल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. यावेळी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. भाजपा नेत्यासोबत झालेल्या बाचाबाचीनंतर आंदोलकांनी त्यांचे कपडे फाडल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

नेमकं घडलं काय?

श्रीगंगानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपा एससी मोर्चाची सभा सुरू होती. या सभेसाठी म्हणून मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलाश मेघवाल जात असताना वाटेतच शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलन करत होते. शेतकरी भाजपाविरोधात घोषणा देत असताना कैलाश मेघवाल त्यांच्यासमोर आले. त्यामुळे संताप अनावर झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी कैलाश मेघवाल यांच्यासोबत आंदोलकांची बाचाबाची झाली. हा वाद टोकाला जाऊन आंदोलकांनी मेघवाल यांचे कपडे देखील फाडले. हा वाद अधिक विकोपाला जाण्याआधीच पोलिसांनी मध्ये पडत आंदोलक आणि भाजपा कार्यकर्त्यांना, तसेच मेघवाल यांना बाजूला नेले.

 

गंगानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाकडून राजस्थानमधील जलसंधारण आणि महागाई याविरोधात आंदोलन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी कैलाश मेघवाल जात असतानाच त्यांचा सामना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी झाला. दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाल्यानंतर हे प्रकरण चिघळलं आणि थेट मेघवाल यांचे कपडे फाटण्यापर्यंत गेलं.