उत्तर प्रदेशातील खेड्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत ९८.२ टक्के गुण मिळवले असून थेट अमेरिकेच्या विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे. अनुराग तिवारी लखीमपूर जिल्ह्यातील सरसन गावात वास्तव्यास आहे. अनुरागने सीबीएसई बोर्डातून बारावीच्या परीक्षेत ९८.२ टक्क्यांसहित घवघवीत यश मिळवलं आहे. परीक्षेतील यशाने अनुरागसाठी अमेरिकेच्या प्रतिष्ठित  Ivy League University ची दारं खुली केली असून पूर्ण स्कॉलरशिप देण्यात आली आहे. अनुराग तिवारीने कॉर्नेल विद्यापीठासाठी आपली निवड झाली असून तिथे पण अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण घेणार असल्याची माहिती दिली आहे. पीटीआयने यासंंबंधी वृत्त दिलं आहे.

कोणत्या विषयात किती गुण ?
सीबीएसई बोर्डाकाडून जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार, १८ वर्षीय अनुराग तिवाराने गणितात ९५, इंग्लिशमध्ये ९७, राज्यशास्त्रात ९९ तर इतिहास आणि अर्थशास्त्रात पैकीच्या पैकी १०० गुण मिळवले आहेत.

बारावीच्या परीक्षेत मिळवलेल्या या यशामुळे अनुरागचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अनुरागने शैक्षणिक मूल्यांकन चाचणीत १३७० गुण मिळवले होते. डिसेंबर २०१९ मध्ये ही चाचणी झाली होती. अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश देण्यासाठी ही चाचणी घेतली जाते. अनुरागला डिसेंबर महिन्यातच कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी संमती देण्यात आली असल्याचं पत्र मिळालं होतं. पण हा प्रवेश अनुरागला बारावीत किती गुण मिळतात यावर आधारित होता. निकाल आल्यानंतर अनुरागला अजून एक पत्र मिळालं असून यामध्ये पूर्ण स्कॉलरशिप देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

कुटुंबाने केला अनेक अडचणींचा सामना
अनुरागने आपला इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता असं सांगितलं आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनुरागला सितापूर जिल्ह्यात जाऊन एका निवासी शाळेत शिक्षण घ्यावं लागलं. अनुरागच्या कुटुंबात आई-वडील तसंच तीन मोठ्या बहिणी आहेत. यामधील एकीच लग्न झालं आहे.

“सुरुवातीला माझे आई-वडील मला सितापूरला पाठवत नव्हते. माझे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे. मी सितापूरला गेलो तर पुन्हा घरी शेती करण्यासाठी परतणार नाही अशी त्यांना भीती होती. पण माझ्या बहिणींनी त्यांना समजावलं,” असं अनुराग सांगतो. आता सर्वजण आनंदी असून त्यांना माझा अभिमान वाटतो अशी भावना अनुरागने व्यक्त केलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि कामाचा अनुभव घेतल्यानंतर आपण पुन्हा भारतात परतणार असल्याचंही अनुरागने सांगितलं आहे.