गेल्या वर्षभरात (मार्चपर्यंत) राज्यातील केवळ चार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत, असे सांगत शेतकरी आत्महत्यांमागे अनेक खासगी कारणे असू शकतात. कौटुंबिक कारणेही असू शकतात, असे वक्तव्य मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील भाजप सरकारला विरोधक आणि शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाने गेल्या आठवड्यात कमालीचे हिंसक वळण घेतले होते. विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात किमान पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. मंदसौर जिल्ह्य़ात गेल्या मंगळवारी पिपलियामंडी येथील पिपलिया टोलनाक्यावर हिंसाचार उसळला. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तसेच रस्त्यावरून जाणारी काही वाहने त्यांनी पेटवून दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. त्यामुळे धुमश्चक्रीची धार अधिकच वाढली. त्याच दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार झाला व त्यात पाच शेतकऱ्यांनी जीव गमावला. या घटनेनंतर राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारला विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केलाच नाही, असा दावा सुरुवातीला शिवराजसिंह चौहान सरकार आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी केला होता. पण त्यानंतर केलेल्या चौकशीत पोलिसांनीच गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले होते. अखेर गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनीही पोलिसांच्या गोळीबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली होती. आता त्याच भूपेंद्र सिंह यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत माहिती देताना शेतकरी आत्महत्यांमागे कौटुंबिक तसेच इतर खासगी कारणेही असू शकतात, असे विधान केले आहे. शेतकरी आंदोलन आणि पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करणारे भाजप सरकार आता भूपेंद्र सिंह यांच्या वक्तव्याने आणखीनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.